घरमहाराष्ट्रपालिका आयुक्त परदेशींची तडकाफडकी बदली

पालिका आयुक्त परदेशींची तडकाफडकी बदली

Subscribe

संपूर्ण देशात करोनाने सर्वाधिक भयानक स्थिती मुंबई शहरात निर्माण केली आहे. मुंंबई महानगर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना ही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने दिवसागणिक शहरातील करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेच्या आयुक्तपदावरुन प्रवीण परदेशी यांना हटवून त्यांच्या जागी राज्याचे नगरविकास सचिव इक्बालसिंह चहल यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना घ्याव्या लागलेल्या या सगळ्यात धक्कादायक प्रशासकीय निर्णयानंतर त्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कळविण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांना नगरविकास खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी दिली आहे.

पंतप्रधान ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत सातत्याने चिंता व्यक्त करण्यात येत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत आयुक्तांसह एकूण दहा सनदी अधिकारी सध्या कार्यरत आहेत. १३ एप्रिल २०१९ ला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्विकारलेल्या प्रवीण परदेशी यांच्या कार्यकुशलतेच्या मर्यादा करोनावर उपाययोजना राबविताना उघडकीस आल्या आहेत. प्रवीण परदेशी यांनी आपली निर्णय प्रक्रिया शुभेंद्र कानडे आणि वरुण श्रीवास्तव यांच्याभोवतीच केंद्रीत केल्याचा जोरदार फटका प्रशासनाला बसला आहे. यापैकी शुभेंद्र हे माजी सनदी अधिकारी रमेशचंद्र कानडे यांचे चिरंजीव असून परदेशींचे जवळचे नातेवाईक आहेत. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि सहआयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांनाही या जोडगोळीच्या कलानुसारच निर्णय घेण्यास भाग पाडले जात होते.

- Advertisement -

अनेक विभागांतल्या उपायुक्तांना आपली बदली का आणि कशी झाली, हेही कळेनासे झाले होते. त्यामुळे बर्‍याचवेळा निमंत्रित नोडल अधिकार्‍यांना काय आदेश निघतात आणि त्याचे पालन कोण आणि कसे करतंय याचा पायपोस कुणालाच नाही, अशी परिस्थिती असल्याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकार्‍याने सांगून प्रशासकीय खदखद बोलून दाखवली. सनदी अधिकारी परदेशींच्या नातेवाईकांकडून आदेश घेण्यापेक्षा जे समोर दिसेल त्या साचेबध्दपध्दतीने काम करणे पसंद करत होते. त्यामुळे उडालेल्या गोंधळामुळे देशाची आर्थिक राजधानी पूर्णत: करोनाच्या भक्षस्थानी जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

याच सगळ्या गदारोळाचा परिपाक काही दिवसांपूर्वी परदेशी आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगीत झाल्याचे एका मंत्र्याने सांगितले. आयुक्तपदी सक्षम अधिकारी नियुक्त झाला नाही तर शहराची अवस्था बिकट होईल असा सूर नगरसेवकांनीही मुख्यमंत्र्यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत काढला होता.त्यामुळे नितीन करीर, किंवा इक्बालसिंह चहल यांना पालिकेत पाठविण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. सध्या प्रशासनाची सर्व सूत्रे हाती असलेल्या मुख्य सचिव अजोय मेहतांना चहल यांना आयुक्त म्हणून पाठवायचे होते तर मुख्यमंत्री ठाकरेंची पसंती नितीन करीर यांना होती. मात्र या नियुक्तीमुळे चहल यांनी बाजी मारली असली तरी त्याला दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाचेही कंगोरे आहेत.

- Advertisement -

गुरुवारी मंत्रालयातील प्रधान सचिवांना करोनाची बाधा झाल्यानंतरही त्यांना बराच वेळ शहरातील रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हता. याकडे लक्ष वेधून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी म्हणाला, जर वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या वाट्याला हे येत असेल तर सामान्य माणसाला काय सोसायला लागत असेल, याचा विचार न केलेलाच बरा. पालिका आयुक्तांनी सतत निर्णय बदलले आणि ठपका पोलीस व्यवस्थेवर बसला. पण धारावी, शिवाजीनगरमध्येच नव्हेतर मुंबईतील अनेक भागात पालिका यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी झाली आहे.

नितीन करीर आणि आय. एस.चहल यांना महापालिकेच्या तळाच्या व्यवस्थापनाचा अनुभव नाही. मात्र अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी दिल्याने परिस्थिती नव्या आयुक्तांच्या नियंत्रणात येऊ शकेल. जागतिक आरोग्य संघटनेने केंद्र सरकारला दिलेल्या मापकांनुसार राज्याच्या इतर भागात एक करोनाबाधित ३ ते ९० जणांना रोगाची लागण करु शकतो. तर मुंबईत करोनाचा एक बाधित ४८७ जणांना लागण करु शकतो. अशातच अनेक क्वारंटाईन केंद्रात स्थिती खूपच वाईट आहे. खासगी रुग्णालयात नागरिकांची लूट सुरू आहे. सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात गुरुवारी रुग्णाच्या शेजारीच मृतदेह ठेवल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पालिकेची तर पळताभुई थोडी झाली आहे. त्याच कारणाने पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि ठाकरे सरकारवरही भाजपने जोरदार टिका केली आहे.

सनदी अधिकार्‍यांच्या या कंपूयुध्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खूपच दयाभावना दाखवत कनवाळूपणाचा अवलंब करत असल्याने त्याची किंमत पर्यायाने ठाकरेंना आणि त्यांचा पक्ष शिवसेना यांना मोठ्या प्रमाणात नजिकच्या काळात मोजायला लागू शकते. त्यामुळेच शुक्रवारी संध्याकाळी प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर ते कमालीचे दुखावले होते. त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो उशिरापर्यंत झाला नव्हता. अवघ्या एका वर्षात उचलबांगडी झालेले परदेशी संध्याकाळी मात्र नगरविकास किंवा जलसंपदा खात्याच्या जबाबदारीसाठी लॉबिंग करण्यात व्यस्त झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -