घर उत्तर महाराष्ट्र नाशिक ढोलचा डंका : एकसंघ वादकांच्या पथकाचा अफलातून शिवनाद

नाशिक ढोलचा डंका : एकसंघ वादकांच्या पथकाचा अफलातून शिवनाद

Subscribe

नाशिक : शिवनाद वाद्यपथकाकडून मराठी संस्कृतीची जोपासना सुरू आहे. पथकातील ६० वादक आजही कायम आहेत. पथकातील वादकांना शास्त्रोक्त पद्धतीने वादनाचे शिक्षण देण्यासह नियमित सराव करून घेतला जात असल्याची माहिती शिवनाद ढोल-ताशा पथकाचे प्रमुख आनंद ओक यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली. (Cultivation of Marathi culture by Shivnad Dholtasha Pathak, Nashik)

आनंद ओक पुढे म्हणाले की, वादनाची आवड असल्याने आपलेही पथक असावे, असा निश्चय केला होता. २०१३ मध्ये पुण्यात गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचे वादन केले जात असल्याने १० मित्र पुण्याला गेलो. पुण्यातील पथकांचे वादन पाहिले, अनेक वादकांशी संवाद साधला. त्यानंतर शिवनाद वाद्यपथकाची २०१३ मध्ये स्थापना केली. मयुरेश शिंदे, अक्षय पाटील, प्रतिक ढंभीर, अनुपम सराफ, वेदांत गदाते हे शिवनाद पथकाचे पथकप्रमुख आहेत. सुरुवातीला पथकामध्ये दोन ढोल, एक ताशा व अवघे पाच जण होते. मित्रांनी एकत्र येऊन ढोल खरेदी केले. नियमित सराव केला. त्यामुळे पथकात वादकांची संख्या वाढत गेली.

- Advertisement -

आता पथकामध्ये १२५ वादक असून, त्यात ६० महिला वादक आहेत. २०१७ पर्यंत पथकात महिलांचे प्रमाण कमी होते. पथकामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रबोधन केले. शिवाय, पथकामध्ये एक शिक्षिका आहे. त्यांच्यामुळेही महिलांची संख्या वाढली. पथकात पाच वर्षांपासून ते ६५ वयापर्यंतचे वादक आहेत. केशरी कुर्ता व सलवार असा पथकाचा पोशाख आहे. गेल्या पाच वर्षांपासून पथकामध्ये संबळ, हलगीचा समावेश करण्यात आला आहे.

वादकांच्या संख्या वाढीसाठी कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. त्यास नाशिकच्या तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर पथकामध्ये वादकांची संख्या वाढत गेली. पथकात महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे वादकांचे पालक विश्वासाने त्यांना सरावासाठी पाठवतात. नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले काही वादक गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी आवर्जुन मदतीला येतात. ते पथकामध्ये समन्वयक म्हणून कामकाज करतात. त्यामुळे पथकातील सदस्य आजही एकसंघ आहेत. वादकांच्या एवढ्या वर्षांची सोबत असल्याने हा चमू समविचारी होऊन एक अफलातून जुगलबंदीच निर्माण झाली आहे. त्याची अनुभूती जेव्हा सार्वजनिक सोहळ्यात ढोलवादन केले जाते, तेव्हा उपस्थित प्रेक्षकांना घेता येते.

- Advertisement -

पथकातर्फे दरवर्षी शिवजयंती, गणेशोत्सवासह सण व उत्सवात वादन केले जाते. पथकाने गुजरातमध्येही वादन केले आहे. विसर्जन मिरवणुकीत दंडे हनुमान मित्रमंडळाच्या वतीने वादन केले जाते. दोन वर्षांपूर्वी पथकाचे गाणे रिलीज झाले आहे. पथकात शिक्षक, वकील, महावितरणचे अधिकारी, डॉक्टर, सीए आहेत. मुंबईनाका परिसरात १ जुलैपासून वादनाचा सराव सुरू आहे. दररोज तीन तास सराव केला जातो. शिवनाद पथकात वादकांना शास्त्रोक्त पद्धतीने वादनाचे धडे दिले जातात.

गणेश स्तोत्र म्हटल्यानंतर वादनास सुरुवात होते. वादनातून वादकांना जीवनमूल्ये समजतात. वैयक्तिक आयुष्यात वादकांना शिस्त, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखण्यास मदत होते. वादकांचे पालकसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देतात. पथकातील तालबद्ध व लयबद्ध वादन पाहून नाशिककरांची उत्स्फूर्त दाद मिळते. पथकात आवर्तननुसार वादन केले जाते. प्रत्येक राऊंडनंतर ताल बदलला जातो. त्यामुळे वादनात रंगत येते. पथकाचे शिस्तवादन पाहून गणेश विसर्जन मिरवणुकीतील सहभागी झालेले गणेशभक्त व नागरिक ठेका धरतात.

हे आहे शिवनाद पथकाचे वेगळेपण

  • पथकास ९ वर्षे झाली असून, आजही सर्वजण एकत्र आहेत
  • पथकातील वादक एकमेकांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात
  • पथकातर्फे चामरलेणी परिसरात २५० झाडांचे वृक्षारोपण
  • पथकात मौजमजा करणारे नव्हे तर स्वयंशिस्त, संस्कृतीचे जतन करणारे वादक आहेत
  • धर्मो रक्षति रक्षित: हे पथकाचे बोधवाक्य आहे
  • यंदा मिरवणुकीत पथकातर्फे अनोख्या तालावर वादन असेल
  • विसर्जन मिरवणुकीत ढोल, ताशा या वाद्यांसोबत शंखनादही असेल
- Advertisment -