घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र५ कोटींचा अपहार करणार्‍यांना पाठीशी घालणारे लेखापरीक्षक संशयाच्या भोवर्‍यात

५ कोटींचा अपहार करणार्‍यांना पाठीशी घालणारे लेखापरीक्षक संशयाच्या भोवर्‍यात

Subscribe

नाशिक : त्र्यंबक येथील वादग्रस्त कैलास नागरी पतसंस्थेच्या सर्वसामान्यांच्या ठेवीदारांच्या ५ कोटी 34 लाखांचा अपहार करणार्‍या संचालक व कर्मचार्‍यांना लेखा परीक्षक पुष्कराज घैसास यांनीच पाठीशी घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संस्थेतील गैरव्यवहार उघड झाला त्याचवेळी संबंधितांविरुद्ध सहकार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी घैसास यांची होती. मात्र, त्यांनी कुठलीही कारवाई न केल्याने घैसास हेच संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

कैलास नागरी पतसंस्थेत संचालक आणि कर्मचार्‍यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तब्बल 5 कोटी 34 लाख रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी संस्थेचे 2017 -18 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण 1 सप्टेंबर 2017 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक 5 अन्वये अनिल बी. घैसास अ‍ॅण्ड कंपनीसाठी सनदी लेखापाल पुष्कराज घैसास यांनी केले. तसा अहवाल संस्थेसह जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सादर केला. कैलास नागरी पतसंस्थेत अनेक गैरव्यवहार झाल्याचे घैसास यांच्या निदर्शनास येवूनही त्यांनी काही महत्वाच्या बाबी जाणीवपूर्वक टाळल्याचे दिसून येते. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केलेल्या लेखा परीक्षणात या अपहारासाठी संस्थेचे तात्कालीन संचालक व कर्मचारी अशा सात जणांना दोषी धरण्यात आले.

- Advertisement -

संचालकांच्या निष्काळजीपणामुळे एवढा मोठा अपहार झाल्याचा ठपकादेखील या अहवालात ठेवण्यात आला. या अपहार प्रकरणामुळे त्र्यंबकमध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, घैसास यांनी केलेल्या लेखापरीक्षणातील गंभीर बाबींचा विनिर्दिष्ट अहवाल 30 एप्रिल 2019 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सादर केला. त्यानुसार कैलास नागरी पतसंस्थेच्या अपहाराला जबाबदार असणार्‍यांविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 (5) (ब) मधील तरतुदीनुसार उचित कारवाई करावी व तसा अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सादर करावा, असे पत्र 5 जुलै 2019 रोजी घैसास यांना देण्यात आले.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार लेखा परीक्षक आपल्या लेखापरीक्षण अहवालात कोणती व्यक्ती लेख्यांसंबंधातील कोणत्याही अपराधाबद्दल दोषी आहे, या निष्कर्षाप्रत आला असेल तर तो लेखा परीक्षण अहवाल सादर केल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांत निबंधकाकडे विर्निष्ट अहवाल दाखल करेल. संबंधित लेखापरीक्षक निबंधकाची लेखी परवानगी प्राप्त केल्यानंतर अपराधाची एफआयआर अहवाल दाखल करेल. जो लेखा परीक्षक एफआयआर दाखल करण्यात कसूर करेल तो अनहरतेस पात्र ठरेल. तसेच, त्याचे नाव लेखा परीक्षकांच्या नामतालिकेतून काढून टाकले जाईल. संबंधित निबंधकास योग्य वाटेल अशा कोणत्याही कार्यवाहीस तो लेखा परीक्षक पात्र ठरेल. असे असताना कैलास नागरी पतसंस्थेच्या अपहारासंदर्भात चाचणी लेखा परीक्षणातून अपहारास जबाबदार संचालक व कर्मचार्‍यांची नावे स्पष्ट होवूनही कैलास नागरी पतसंस्थेवर अद्याप कुठलाही गुन्हा दाखल न झाल्याने लेखापरीक्षक घैसास संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

- Advertisement -

त्या अहवालाच काय?

कैलास नागरी पतसंस्थेच्या अपहारास दोषींविरुद्ध आवश्यकते नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 (5) ब मधील तरतुदीनुसार उचित करावाई करावी व तसा अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर करावा असे पत्र तत्कालीन जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी 5 जुलै 2019 रोजी दिले असताना पुष्कराज घैसास यांनी काय कारवाई केले हे अद्याप गुलदत्सातच आहे.

अद्याप एफआयआर का नाही?

कुठल्याही संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण झाल्यानंतर विर्निदिष्ट अहवाल जो लेखा परीक्षक सादर करेल त्यानेच पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करावी, असा सहकार कायद्याचा नियम असताना घैसास यांनी एफआयआर का दाखल केला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कैलास नागरी पतसंस्थेत वैधानिक लेखा परीक्षण हे आम्ही केलेले आहे. त्याबाबत कारवाई करण्यासंबंधी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे ही कारवाई जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने करावयाची आहे. याबाबत आणखी माहिती देऊ शकत नाही. : पुष्कराज घैसास, लेखापरिक्षक, अनिल बी. घैसास अ‍ॅण्ड कंपनी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -