घरमहाराष्ट्रनाशिक‘ऑडिओ क्लिप’मधून गिरीश महाजनांची पोलखोल

‘ऑडिओ क्लिप’मधून गिरीश महाजनांची पोलखोल

Subscribe

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी डावलण्यात आल्यापासून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे भाजपशी त्यांचे कट्टर वैर झाले. कोणामुळे आणि कसे तिकिट कापले गेले, याचे पुरावे समर्थकांना ऑडिओ क्लिपव्दारे ऐकवले जाणार असल्याचे समजते.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी डावलण्यात आल्यापासून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे भाजपशी त्यांचे कट्टर वैर झाले. कोणामुळे आणि कसे तिकिट कापले गेले, याचे पुरावे समर्थकांना ऑडिओ क्लिपव्दारे ऐकवले जाणार असल्याचे समजते. या क्लिपमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘यावेळी मोदी लाट ओसरली’ असल्याचे वक्तव्य केल्याचे समजते. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली व हा मेळावा घेऊ नका म्हणून काही नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकमंत्र्यांचा फोन त्यांनी ‘नॉट रिचेबल’ केल्यामुळे आता पाडण्याचे राजकारण रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सुरगाणा तालुक्यात शुक्रवारी, २९ मार्चला भरदुपारी एकला एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांना निमंत्रित करून आपले बळ दाखवण्याचे आव्हान खासदार चव्हाण यांच्यासमोर असणार आहे. दिंडोरी मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याबाबत असमर्थता दर्शवली. तसेच पक्षांतराचा निर्णय घेऊन राजकीय विजनवासात जाण्यापेक्षा पक्षात राहूनच पूनर्वसन करून घ्या, असा मौलिक सल्ला त्यांना काही जाणकारांनी दिला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ऐनण्याच्या मनस्थितीत नसलेले खासदार चव्हाण भाजपच्या विरोधात मेळावा घेऊन पालकमंत्र्यांना जाब विचारणार आहेत.

- Advertisement -

जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वणी येथील आरोग्य शिबिरास अपेक्षित अर्थसाह्य केले नाही. त्याचा राग मनात ठेवून पालकमंत्र्यांनी ही चाल खेळल्याचा आरोप त्यांचे समर्थक करतात. चव्हाण यांची उमेदवारी नाकारली गेल्यानंतर बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पदाधिकारी यांनी राजीनामे पाठवले आहेत. सुरगाणा येथील मेळाव्यात भाजप व शिवसेना दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बुथप्रमुख असतील. त्यांच्यासमोर खासदार चव्हाण आपली नाराजी व्यक्त करणारे व्हिडिओ व पोस्ट वाचून दाखवतील. तसेच पालकमंत्र्यांनीच पत्ता कट केल्याचे काही संकलित पुरावे दाखवून कार्यकर्त्यांची मनधरणी केली जाणार आहे. आक्रमक शैलीतील भाषा वापरणार्‍या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी देऊन वातावरण निर्मिती केली जाणार असल्याने भाजपच्या उमेदवारीवर याचा किती परिणाम होतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -