घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबाजार समिती निवडणूक : कळवणमध्ये सत्ताधार्‍यांना रोखण्याचे विरोधकांपुढे आव्हान; विरोधकांचे मनोमिलन होण्याची...

बाजार समिती निवडणूक : कळवणमध्ये सत्ताधार्‍यांना रोखण्याचे विरोधकांपुढे आव्हान; विरोधकांचे मनोमिलन होण्याची शक्यता

Subscribe

नाशिक : कोरोनामुळे रेंगाळलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तब्बल दोन वर्षांनंतर मुहूर्त सापडला असून शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीची यंदाची निवडणूक चुरशीची होणार असून बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी तीन पॅनलमध्ये लढतीची शक्यता असली तरी काही घटकांकडून विरोधी दोन्ही पॅनल एकत्र करण्याची रणनीती आखली जात असल्याने माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. अंतिम टप्प्यात किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतात आणि सत्ताधार्‍यांविरोधात विरोधकांचे मनोमिलन होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कळवण बाजार समितीची सत्ता जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष धनंजय पवार यांच्याकडे आहे. धनंजय पवार सत्ता कायम राखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.मागील निवडणुकीत धनंजय पवार यांना साथ देणारे जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे यांनी यंदा स्वतंत्र पॅनल निर्मितीचे सूतोवाच केले असून नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यात देवरेंनी आपली भूमिका स्पष्ट करत बाजार समिती निवडणुकीसाठी आपले पॅनल राहणार असल्याचे जाहीर केले आहे. तर मागील निवडणुकीत विरोधात पॅनल निर्मिती करणार्‍या माजी आमदार जीवा पांडू गावित यांनीही शेतकरी मेळावा घेत पॅनल निर्मिती करणार असल्याचे सांगितले आहे. सहकार क्षेत्रातील ही निवडणूक असली तरी आगामी काळात जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

पॅनल निर्मिती करतांना वेगवेगळी व्यूहरचना केली जात असून आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तालुक्यातील अनेक नेते कामाला लागले आहेत. मात्र या निवडणुकीत मतदार संख्या मर्यादित असल्याने एक-एक मत महत्त्वाचे ठरणार आहे. सद्यस्थितीत विद्यमान आमदार नितीन पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या धनंजय पवारांकडे बाजार समितीची सत्ता असून सत्तापालट करण्यासाठी माजी आमदार जे.पी. गावित यांनी चंग बांधलेला आहे. तर रवींद्र देवरे यांनीही सत्तापरिवर्तनासाठी पॅनल निर्मिती करण्याचे जाहीर केले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे कळवण हे होमटाऊन असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत पॅनल नसले तरी आपल्या समर्थकांची बाजार समितीत वर्णी लागावी यासाठी त्या कोणत्या पॅनलला उघड पाठिंबा देतात की छुपी मदत करतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. डॉ. पवारांचा प्रभाव कितपत या निवडणुकीत दिसणार हा प्रश्नच असला तरी निवडणूक निकालानंतर ते स्पष्टच होणार आहे. एकंदरीतच, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यंदा चुरशीची होणार हे स्पष्ट असल्याने या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

तिसरे पॅनल होणार की विरोधक एकवटणार

गेल्या चौदा ते पंधरा वर्षांपासून जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष धनंजय पवार यांची एकहाती सत्ता बाजार समितीवर आहे. पवारांचे बाजार समितीवरील हे निर्विवाद वर्चस्व रोखण्यासाठी यंदा विरोधकांनी कंबर कसली आहे. मागील वेळेचे प्रमुख विरोधक माजी आमदार जे.पी. गावित यांनी आपली भूमिका जाहीर करण्याआधीच रवींद्र देवरे यांनी शेतकरी आणि समर्थकांचा मेळावा घेऊन स्वतंत्र पॅनल निर्मितीची घोषणा केली आहे. तर त्यानंतर जे.पी. गावितांनी कळवण बाजार समितीच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत पॅनल निर्मितीची घोषणा केली आहे. सत्ताधार्‍यांच्या विरोधात दोन पॅनल होणार असे चित्र सध्या दिसत असले तरी दोन पॅनल न होता एकच पॅनल व्हावे यासाठी काही घटक प्रयत्नशील असून गावित- देवरेंचे मनोमिलन करून विरोधात एकच पॅनल निर्मितीसाठी पडद्याआडून शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याने निवडणूक दोन पॅनलमध्ये होणार की तीन पॅनलमध्ये चुरशीचा सामना रंगणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -