घरमहाराष्ट्रनाशिकसाहित्य संमेलनात रसिकांसाठी कार्यक्रमाची पर्वणी

साहित्य संमेलनात रसिकांसाठी कार्यक्रमाची पर्वणी

Subscribe

संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कवीकट्टा, सांस्कृतिक कार्यक्रम, बाल साहित्य मेळावा, कलाप्रदर्शन असे विविधांगी कार्यक्रम

नाशिक : शहरात होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद, कवीकट्टा, सांस्कृतिक कार्यक्रम, बाल साहित्य मेळावा, कलाप्रदर्शन अशा विविधांगी कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

साहित्य संमेलन ३, ४ व ५ डिसेंबर २०२१ ला होणार असून, संमेलन स्थळ मेट भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक हे आहे. साहित्य संमेलन कवीवर्य कुसुमाग्रजनगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस, आडगाव येथे ३ ते ५ डिसेंबर रोजी होणार आहे. संमेलनाच्या आधी गुरुवार, दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी, दि.३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिळकवाडी येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. निमाणी बसस्टॅण्डपर्यंत पायी जाऊन तेथून बसेसव्दारे कवीवर्य कुसुमाग्रज नगरीपर्यंत ही दिंडी जाणार आहे. संमेलनस्थळी सकाळी ११ वाजता ध्वजवंदन होईल. दुपारी चार वाजता ग्रंथ प्रदर्शन आणि त्यानंर संमेलनाचे उद्घाटन होईल. स्वागताध्यक्षांचे भाषण, संमेलनाध्यक्ष व माजी अध्यक्षांचा सत्कार, अध्यक्षांचे मनोगत आणि नवीन अध्यक्षांकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान, उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण होईल. रात्री ९ वाजता निमंत्रित कवींचे संमेलन होईल. शनिवारी, दि.४ डिसेंबर रोजी सायंकाळी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम होतील.

- Advertisement -

शनिवार, दि.४ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहराणे आणि ग्रंथालीचे सुदेश हिगलाजपूरकर यांचा सत्कार डॉ. जयंत नारळीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर डॉ. नारळीकर यांचे कथावाचन होईल. याच दिवशी संवाद लक्षवेधी कवींशी हा कार्यक्रम होणार आहे. स्मृतीचित्रे : लक्ष्मीबाई टिळक या विषयावर परिचर्चा होईल. नाशिक जिल्हा स्थापनेला १५० वर्षे झाल्यानिमित्त जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प या विषयावरील परिसंवाद जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. रात्री ९ वाजता निमंत्रित कवींचे संमेलन होईल. कवी श्रीधर नांदेडकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत.

रविवार, ५ डिसेंबर रोजी डॉ. रामदास भटकळ यांची मुलाखत डॉ. चंद्रकांत पाटील आणि दिलीप माजगावक घेणार आहेत. समारोपाच्या दिवशी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यंदा पहिल्यांदाच बाल साहित्य मेळावा होणार आहे. या मेळाव्याचे उदघाटन अभिनेता दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनस्थळी नाशिकचे शिल्पकार, चित्रकारांचे कलाप्रदर्शनही होणार आहे. तसेच, पुस्तक प्रदर्शनही भरवले जाणार असून, कवीकट्टा होणार आहे.

- Advertisement -

दोन दिवस परिसंवाद

कोरोनांतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहारे, मराठी नाटक-एक पाऊल पुढे, दोन पावले मागे, शेतकर्‍यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयीपणा, लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका, ऑनलाईन वाचन : वाड:मय विकासाला तारक की मारक, साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थोतांड, गोदातिरीक्ष्या संतांचे योगदान या विषयांवर ४ व ५ डिसेंबर रोजी परिसंवाद होणार आहेत.

निविदा भरण्याची अंतिम मुदत ८ नोव्हेंबर

साहित्य संमेलनाबाबत विविध कामांचे सशुल्क निविदा अर्ज संमेलनाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. सीलबंद निविदा स्विकारण्याची अंतिम दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. संबंधितांनी संमेलन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन स्वागत समितीने कले आहे. निविदांमध्ये मंडप (व्यासपीठ, प्रवेशद्वारे, दालने उभारणे), केटरिंग व भोजन व्यवस्था, ध्वनी यंत्रणा (प्रकाश योजना, एलसीडी स्क्रीन व्यवस्था, जनरेटर्स), फोटोग्राफी व व्हिडीओ शूटिंग, प्रिंटिंग व स्टेशनरी (ओळखपत्रे, बिल्ले, स्मरणिका, लेटर हेड, पाकिटे, सन्मानपत्र), स्मृतिचिन्हे, बॅचेस, सॅनिटरी मफलर्स, मास्क , वाहतूक व्यवस्थेसाठी कार्स व बसेस आदी कामांचा समावेश आहे.

संमेलन पदाधिकार्‍यांची महापौरांशी चर्चा

मराठी साहित्य संमेलन बद्दलांची माहिती देण्यासाठी व त्या अनुषंगाने संमेलन पदाधिकार्‍यांनी बुधवारी (दि.२७) महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, गुरमीत बग्गा, शिवाजी गांगुर्डे, जगदीश पाटील यांची भेट घेत चर्चा केली. संमेलनासाठी महापालिकेतर्फे सहकार्य मिळेल, असे सर्वांनी पदाधिकार्‍यांना सांगितले. यावेळी संमेलन प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, कार्यवाह सुभाष पाटील, संजय करंजकर, प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे, समिती समन्वयक विश्वास ठाकूर, किरण समेळ, चंद्रकांत दीक्षित उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -