घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजिल्हा मजूर संघात मोठा 'धोबीपछाड"; 'या' दिग्गज गटाला शह देत 'हे' झाले...

जिल्हा मजूर संघात मोठा ‘धोबीपछाड”; ‘या’ दिग्गज गटाला शह देत ‘हे’ झाले अध्यक्ष

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील ठेकेदारांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय असलेल्या जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष संपतराव सकाळे व राजेंद्र भोसले यांच्या गटात चुरस निर्माण झाली होती. अखेर मंगळवारी (दी१०) अध्यक्ष झालेल्या निवडणुकीत संचालकांचा कौल समोर आला आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नांदगाव येथील प्रमोद भाबड यांचा तर उपाध्यक्ष पदी जायंट किलर ठरलेल्या नाशिक तालुक्याच्या संचालक शर्मिला कुशारे विजयी झाल्या. संचालक पदाच्या निवडणुकीच्या काळातच माजी अध्यक्ष संपतराव सकाळे आणि राजेंद्र भोसले यांच्यात दोन गट पडले होते. यातही सकाळे यांची बाजू भक्कम मानली जात असताना भोसले गटाचे आणि आ.सुहास कांदे यांनी ज्यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले असे प्रमोद भाबड यांना २० पैकी १२ सदस्य आपल्या गळाला लावण्यात यश आले आहे.

जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षांची निवड मंगळवारी (दि.10) सकाळी संघाच्या कार्यालयात पार पडली. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत आठ जागा बिनविरोध झाल्यानंतर बारा जागांसाठी मतदान घेण्यात आले. यात येवला, सिन्नर, देवळा, नाशिक, सुरगाणा, पेठ व चांदवड या ठिकाणी अत्यंत चुरशीची लढाई झाली. तर ओबीसी, एससी, एसटी व महिलांच्या दोन जागांसाठीही मतदान घेण्यात आले. एकूण २० जागांपैकी आठ तालुका संचालक बिनविरोध निवडून आलेले असल्यामुळे त्यांनी थेट अध्यक्ष, उपाध्यक्षपद मिळवण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. संपतराव सकाळे यांचा एक गट तर मालेगावचे राजेंद्र भोसले यांचा दुसरा गट निर्माण झाला होता. तसेच नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्र्यंबकेश्वर-इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक मानली जात होती. यात आमदार सुहास कांदे यांनी सरशी घेत आपल्या मतदार संघातील तसेच निकटवर्तीय असलेले प्रमोद भाबड यांना बळ दिले. आणि भाबड यांचा २० पैकी १२ मत घेत दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवार इगतपुरीचे गोपाळ लहामगे यांना ८ मतांवर समाधान मानावे लागले. लहामगे यांच्यासाठी आमदार हिरामण खोसकर आणि संपतराव सकाळे प्रयत्नशील होते. तर उपाध्यक्ष पदी आमदार सीमा हीरे यांचे दीर मुन्नाजी हीरे यांचा पराभव केलेल्या तसेच भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या नातेवाईक शर्मिला कुशारे विराजमान झाल्या आहेत.

- Advertisement -

अध्यक्षाच्या निवडीचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी रंगत वाढत चालली होती. संचालकांना गळ घालणे, आपल्या गोटात खेचण्यासाठी विविध क्लूप्त्या आजमावल्या जात होत्या. अश्यातच निवडणुकीच्या आदल्या दिवशी सोमवारी (दि.9) निर्णायक घडामोडी घडण्यास सुरवात झाली. मोठ्या प्रमाणात गाठीभेटींना सुरुवात झाली. जास्तीतजास्त संचालकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी रणनीती नुसार चाली खेळल्या गेल्या. त्यातच जिल्ह्यातील आमदारांनी देखील या निवडणुकीत लक्ष घातल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून होते. अश्या परिस्थितीत आमदार सुहास कांदे यांनी बाजी मारत प्रमोद भाबड यांना जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्ष पदी विराजमान केले. माजी अध्यक्ष संपतराव सकाळे आणि आमदार हिरामण खोसकर यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -