घरमहाराष्ट्रनाशिकपोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या सुसाट

पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या सुसाट

Subscribe

दररोज दोन ते तीन घरफोड्या, चोरटे पाळत ठेवून बंद असलेली घरे फोडत असल्याने नागरिकांमध्ये भीती

लॉकडाऊनमध्येदेखील शहरात घरफोडीच्या घटना कायम असून, दररोज दोन ते तीन घरफोड्या होत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. चोरटे पाळत ठेवून बंद असलेली घरे फोडत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या घटना वाढत असल्या तरीही त्या रोखण्यात मात्र पोलिस अपयशी ठरत असल्याचे आकडेवारीवरुन पुढे येत.

शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी मोबाईल, सोनं-चांदीच्या दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारला. याप्रकरणी पंचवटी, भद्रकाली आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. आडगाव नाका, भद्रकाली, पेठरोड आणि मखमलाबाद भागांत घरफोडीच्या या घटना घडल्या आहेत.

- Advertisement -

अंगठी, टॉप्स, रोकड लंपास

जुना आडगाव नाका येथील जेठा मार्केट सोसायटीतील फ्लॅट क्रमांक चारमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी सोन्याची अंगठी, टॉप्स आणि सुमारे १ लाख १० हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी माला हरीश तलरेजा यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. माळी करत आहेत.

भद्रकाली भागातून मोबाईल लंपास

पाटकरी कॉम्प्लेस, फुले मार्केटसमोर, भद्रकाली येथे मोईन पाटकरी यांचे घर आहे. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील विविध मॉडेलचे ५ मोबाईल लंपास केले. याप्रकरणी मोईन नवाज इमाम पाटकरी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.

- Advertisement -

भावाकडे जाताच चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला

पेठ रोडवरील भाग्यलक्ष्मी सोसायटीत मोहन गोडे यांचा फ्लॅट क्रमांक ९ आहे. गोडे मंगळवारी (दि.२२) घराच्या दरवाजास कुलूप लावून कुटुंबियासह भावाकडे गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील दागिने लंपास केले. याप्रकरणी मोहन वामन गोडे यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.

शेतीसाठी गावी जाणे पडले महागात

विजय चौधरी यांचे मखमलाबादमधील स्वामी विवेकानंदनगरमध्ये घर आहे. ते गावी शेती करण्यासाठी घरास कुलूप लावून कुटुंबियांसह गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याचे घराच्या दरवाजाचे कुलूप आत प्रवेश केला. घरातील सुमारे ७९ हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास केली. याप्रकरणी विजय गोविंद चौधरी यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिरे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -