घरमहाराष्ट्रनाशिकहुरडा पार्टीसाठी शहरातील तरुणाईची गावाकडे धाव

हुरडा पार्टीसाठी शहरातील तरुणाईची गावाकडे धाव

Subscribe

पै-पाहूण्यांसाठी हुरड्याचा खास बेत

दादा सोनवणे, श्रीगोंदा : तालुक्यात ग्रामीण भागात गोवर्‍यांची, लाकडांची पेटलेली शेकोटी, त्यात निखार्‍यावर खरपूर भाजली जाणारी ज्वारीची कोवळी दाणेदार कणसे आणि मग हातावर किंवा दगडावर कणीस घुसळल्यानंतर तयार होणारा गरमगरम हुरडा गुळासोबत चाखत जागवलेली रात्र…असे चित्र श्रीगोंद्याच्या आसपास ज्वारीच्या शिवारांमध्ये रंगू लागले आहे. पै पाहूण्यांसाठी हुरड्याच्या खास बेतापासून हुरडा पार्टीपर्यंत ठिकठिकाणी थंडी आणि हुरड्याची रंगत वाढत आहे. या सर्व गोस्ठीकडे शहरातील तरुणाई आकर्षित होत आहे.

श्रीगोंदा तालुक्यात सध्या रब्बी ज्वारीचे पिक अंतिम अवस्थेत आहे. कणसात दाणे भरण्यास सुरवात झाल्यानंतर दुधाळ दाणे हिरवे होवून भरु लागले की त्याला ज्वारी हुरड्यात आली असे म्हणतात. दुधाळ दाणे ते निब्बर दाणे या दोन्हींच्या मधली थोडी कच्चीपक्की अशी ही अवस्था असते. या अवस्थेतील टपोरी कणसे हुरड्यासाठी निवडली जातात. ताटावरुन कणसे खुडताना त्यांचा दांडा लांब ठेवला जातो. लांब दांड्यामुळे कणीस विस्तवात भाजायला सोपे जाते. हुरड्यासाठी विशिष्ट पद्धतीने शेकोटी तयार केली जाते. वार्‍यापासून संरक्षण आणि निखारे जास्त वेळ फुलत रहावेत म्हणून शेतातच घमेल्याच्या आकाराचा खड्डा खणून त्यात होळीसारख्या गोवर्‍या पेटविल्या जातात.

- Advertisement -

अनेक ठिकाणी गोवर्‍यांसोबत लाकडांचाही वापर केला जातो. जाळ संपल्यानंतर निखार्‍यात ही कणसे खुपसण्यात येतात. चारही बाजूने चांगला ताव बसण्यासाठी कणसे वेळोवेळी फिरवतात आणि मग चांगली खरपूस भाजलेल्या कणसांचे दाणे म्हणजेच हुरडा काढण्यासाठी ती तळहात किंवा दगडावर रगडतात. दाण्यांवरील कण्या निट निघाल्या नाहीत तर घशाला त्रास देतात. यामुळे कणसे रगडण्याची कला हुरडा तयार करण्यात सर्वाधिक महत्वाची समजली जाते.काही गावांमध्ये हुरडा पार्टीची मोठी परंपरा लाभली असून, अनेकांनी त्यास व्यवसायिक स्वरुपही दिल्याचे दिसून येते.

गहू, हरभरार्‍याचाही हुरडा

रब्बी हंगामाच्या ज्वारीबरोबरच गहू व हरभरा या दोन्ही पिकांचाही हुरडा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी त्यास वेगवेगळी नावे असली तरी सर्वसाधारणपणे गव्हाच्या हुरड्याला ओंब्यांचा हुरडा व हरभर्‍याच्या हुरड्याला हुळा म्हटले जाते. अनेक ठिकाणी हरभर्‍याचा हुळा करुन वर्षभर खाण्यासाठी साठवून ठेवला जातो. ज्वारीबरोबरच सध्या अनेक ठिकाणी हरभरा ही हुरड्याच्या अवस्थेत असून गव्हाची ओंबी भरण्यास अद्याप सुरवात झालेली नाही.

- Advertisement -

हुरड्याचाही बदलतोय ‘ट्रेन्ड’

गेल्या ८ ते ९ वर्षात अनेक ठिकाणच्या पावसामुळे पारंपरिक ज्वारीच्या पट्ट्यातून हे पीक हद्दपार झाल्याची स्थिती आहे. या पीक बदलाचा परिणाम हुरड्याचा ट्रेन्ड बदलण्यावरही झाला आहे. अनेक शेतकर्‍यांनी ज्वारीचे उत्पादन घेणे बंद केले असले तरी हुरड्यापुरती ज्वारी उत्पादन किंवा इतर ठिकाणांहून आणण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे. त्यातही श्रीगोंदा परिसरातील हुरडा हा तेथील स्थानिक ज्वारीच्या वैशिष्ट्यांमुळे सर्वोत्तम समजला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -