Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र सणांच्या मुहूर्तावर भेसळखोरही तेजीत; तब्बल 11 क्विंटल बनावट खवा हस्तगत

सणांच्या मुहूर्तावर भेसळखोरही तेजीत; तब्बल 11 क्विंटल बनावट खवा हस्तगत

Subscribe

नाशिक : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व दसरा सणांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मिठाई खरेदी केली जात असल्याचा गैरफायदा घेत नाशिकसह गुजरातमधील काही मिठाई उत्पादक व विक्रेत्यांनी भेसळीचा मोठा धंदा मांडला आहे. या व्यापार्‍यांविरोधात धडक कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि.१५) गुजरातमधून नाशिकमध्ये आणण्यात आलेला भेसळयुक्त खव्याचा मोठा साठा जप्त केला. याशिवाय विविध ठिकाणी छापे टाकत २ लाख १० हजार ९१० रुपयांचा साठा जप्त केला.

भेसळयुक्त अन्नपदार्थाबाबत अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून शुक्रवारी (दि.15) पहाटे 5 वाजता पथकाने द्वारका सर्कल येथे गुजरातमधून आलेल्या बलदेव व श्री विजय ट्रॅव्हल्स खासगी बसमधून भेसळयुक्त अन्नपदार्थ आणून रॉयल एक्सप्रेस ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाजवळ उतरवण्यात आला. या भेसळयुक्त खव्याचा वापर हा नाशिक शहरातील मिठाई विक्रेते मिठाई, मलाई पेढा, मलाई बर्फी, कलाकंद इ. पदार्थ तयार करण्यासाठी करतात असा संशय आल्याने व त्यात कुठल्याही प्रकारच्या दुधाचा समावेश नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवून भेसळयुक्त मिठाई जप्त केली.

- Advertisement -

अनुष्का स्वीट सप्लायर्सचे मालक रविकांत सिंग यांच्याकडून स्पेशल बर्फीच्या 11 बॅग्ज (41 हजार), डीकलशियन स्वीटसचे मालक श्याम यांच्याकडील 3 बॅग्ज (11 हजार), कन्हैया यांच्याकडील 5 खोके (17 हजार 290) याप्रमाणे एकूण 69 हजार 290 रूपयांचा साठा जप्त केला. दुसर्‍या कारवाईत द्वारका सर्कल भागातील सोनाका ग्रो-फूड्सचे मालक संदेश कासलीवाल यांनी मागविलेल्या मिठाईच्या साठ्यातून रिच स्वीट डिलाईट अलाँग (राधे) चा 298 किलो व 250 किलो (74 हजार 500), कल्पेश नवरतन गुप्ता (गुरुगोविंद कॉलेजजवळ) यांच्याकडून 148 किलो ट्रॅडिशनल स्वीट्स (29 हजार 660), लच्छाराम चौधरी यांच्या महालक्ष्मी स्वीट्स (जेलरोड) यांनी मागविलेल्या कलाकंद स्वीट्सचा नमुना त्यांच्याकडून घेवून 13 हजार 920 रुपये किंमतीचा 58 किलोंचा साठा जप्त करण्यात आला. याप्रमाणे संपूर्ण जप्त करण्यात आलेल्या भेसळयुक्त अन्नपदार्थाची एकूण किंमत 2 लाख 10 हजार 910 रूपये असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.

अन्नसुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, उमेश सूर्यवंशी, अमित रासकर, प्रमोद पाटील, सहायक आयुक्त, लोहकरे, मनीष सानप, नमुना सहायक विकास विसपुते यांनी सहआयुक्त (अन्न) सं. भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे भेसळखोरांचा भांडाफोड सुरू आहे. तसेच, नागरिकांच्या पोटात मिठाईच्या रुपाने घातक पदार्थ जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुग्धजन्य पदार्थांपासून सावध

- Advertisement -

नागरिकांनी दुधापासुन तयार करण्यात आलेली मिठाई खरेदी करताना ती खरोखर दूध, खवा, मलई किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केलेली आहे किंवा काय, याची खात्री करुनच मिठाई खरेदी करावी. त्याचप्रमाणे सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुधापासूनच बनविलेल्या मिठाईचीच विक्री करावी. तसेच, त्याबाबत दुकानात स्पष्ट फलक लावण्याची सूचना करण्यात आली आहे.

येथे साधा संपर्क

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काहीही संशय असल्यास नागरीकांनी टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

- Advertisment -