घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगुन्हेगारांचे पोलिसांना थेट आव्हान? सलग दुसर्‍या दिवशीही वाहनांची तोडफोड

गुन्हेगारांचे पोलिसांना थेट आव्हान? सलग दुसर्‍या दिवशीही वाहनांची तोडफोड

Subscribe

नाशिक : शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच असून, सलग दुसर्‍या दिवशी गावगुंडांनी सोमवारी (दि.२५) मध्यरात्री नाशिकरोड भागातील धोंगडे मळा परिसरात सुमारे पाच वाहनांची तोडफोड केली. वाढत्या वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांसह वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी धोंगडे मळा परिसरात वाहन तोडफोड करणार्‍यांना चार युवकांना अटक केली आहे.

शुभम बेहनवाल उर्फ बाशी, रोशन पवार भय्यू, बेहनवाल मोईज, जावेद शेख अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. विहितगावातील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधील वाहनांची गावगुंडांनी रविवारी (दि.२३) रात्री तोडफोड व जाळपोळ केली. ही घटना ताजी असतानाच नाशिकरोड परिसरातीलच धोंगडे मळा परिसरातही वाहनांची तोडफोड करण्यात आली. 24 तासांत दोन ठिकाणी वाहन तोडफोडीच्या घटना घडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये अनेक दुचाकींसह चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

- Advertisement -

शहर पोलिसांचा धाक कमी झाल्याने गावगुडांची दहशत वाढत असून, नागरिकांमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. धोंगडे मळा तोडफोडप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेस्टाईल पाठलाग करीत सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, सुरेश गवळी, विनोद लखन, पंकज करपे, राहुल जगताप, सौरभ लोंढे यांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे.

पालकमंत्री देखील बोलले, मात्र… 

नाशिकमध्ये मध्यरात्री पुन्हा गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची घटना समोर आली. नाशिकरोडच्या विहितगाव परिसरात युवकांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही युवकांनी कोयता मिरवत गाड्यांची तोडफोड देखील केली. त्यानंतर सलग दुसऱ्या रात्री देखील अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. विहितगावच्या घटनेनंतर दादा भुसे म्हणाले की, नागरिकांना मी शांततेचं आवाहन करतो. या समाज कंटकांवर कडक कारवाई करण्यात येईल. सीसीटीव्हीच्या आधारे ओळख पटली असून टवाळखोरांची गय केली जाणार नाही, पोलिस आयुक्त यांच्याशी बोललो असून ताबडतोब संशयितांचा शोध घेण्याचा आदेश दिला असल्याचे दादा भुसे म्हणाले. मात्र, गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी पोलिसांची भीती निर्माण होण्यासाठी करण्यात येणारी कारवाई का होत नाही असा प्रश्न विचारला जातोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -