Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम दिवसाढवळ्या दीड लाखांच्या मंगळसूत्राची चोरी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

दिवसाढवळ्या दीड लाखांच्या मंगळसूत्राची चोरी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Related Story

- Advertisement -

नाशिक शहरात वाहन चोरीचा धुमाकूळ सुरु असताना मंगळसूत्र चोरही सक्रिय झाले आहेत. भाजी बाजारातून कोथिंबिर खरेदी करुन घराच्या दिशेने एकट्या येणार्‍या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावरुन चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना मंगळवारी (दि.१६) दुपारी ११.४५ वाजेदरम्यान एकनाथ अपार्टमेंटसमोर, हिरावाडी रोड, पंचवटी येथे घडली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. महिलेच्या दिलेल्या वर्णनानुसार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. याप्रकरणी कांचन कांतीलाल भंडारी (वय ६२, रा.दामोदर नगर, हिरवाडी, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कांचन भंडारी एकट्या घराजवळील भाजी बाजारात कोथिंबिर खरेदीसाठी आल्या होत्या. कोथिंबिर खरेदी केल्यानंतर त्या घराच्या दिशेने हिरावाडी रोडने चालत निघाल्या. त्या एकनाथ अपार्टमेंटसमोर आल्या. त्यावेळी दुचाकीवरुन दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेला एकजण मोबाईलवर बोलत असल्याचे भासवत होता. काही समजण्याच्या आत त्याने कांचन भंडारी यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाखांचे ३ तोळे ७ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. या घटनेत त्या किरकोळ जखमी झाल्या. मंगळसूत्र हिसकावल्याचे समजताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत चोरटे दुचाकीवरुन पळून गेले होते. ही बाब भंडारी कुटुंबियांना समजताच ते मदतीसाठी धावून आले. कांचन भंडारी यांनी कुटुंबियांना आपबिती सांगितल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात कांचन भंडारी यांनी तक्रार दाखल केली. त्यांनी चोरट्यांचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी नाकाबंदी करुन चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, शहर गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील कासर्ले करत आहेत.

- Advertisement -