घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक उंटवाडी येथील ऐतिहासिक वडाचे झाड वाचले!

नाशिक उंटवाडी येथील ऐतिहासिक वडाचे झाड वाचले!

Subscribe

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंचा नाशिककरांना शब्द

नाशिक : उंटवाडी पुलाजवळील ऐतिहासिक वडाचे झाड तोडले जाणार नाही असे आश्वासन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिककरांना दिले. इतकेच नव्हे तर 200 वर्षे जुन्या या वडाच्या झाडाची व नंदिनी नदिची पाहणी करत त्यांनी प्रस्तावित उड्डाणपुलाचे डिझाईन बदलण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा केली.

मायको सर्कल ते त्रिमूर्ती चौकापर्यंत उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यासाठी अनेक झाडांची कत्तल केली जाणार असल्याने यात ‘हेरिटेज’ दर्जा मिळालेल्या वडाचे झाड तोडण्यास स्थानिक नागरिकांसह वृक्षप्रेमींनी तीव्र विरोध केला होता. शुक्रवारी सायंकाळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या झाडाची पाहणी केली. शाश्वत विकासासाठी शंभर वर्षांपेक्षा जुन्या झाडांचे संवर्धन केले जाईल. रस्त्यात येणार्‍या झाडांचे ट्रान्सप्लान्ट करुन जतन केले जाणार असल्याचे मंत्री ठाकरे यांनी सांगितले. तसेच नाशिककरांनो काळजी करु नका, झाड वाचले आहे, अशा शब्दात त्यांनी वडाचे झाड न तोडण्याचे शब्द दिला. कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

पर्यावरणप्रेमींची तोबा गर्दी

झाडाच्या पाहणीसाठी मंत्री ठाकरे येणार म्हटल्यावर पर्यावरण प्रेमींसह नाशिककरांनी या झाडाभोवती तोबा गर्दी केली. त्यामुळे नियोजन करताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मंत्र्यांसोबत सेल्फी, फोटो काढण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी एकाच वेळी गर्दी केल्यामुळे कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. अजिंक्य गिते यांनी मंत्री ठाकरे यांना वटवृक्षाची प्रतिमा भेट दिली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -