घरमहाराष्ट्रनाशिकवैद्यकीय अधिकारीच अडकले पूराच्या पाण्यात, लासलगावातील घटना

वैद्यकीय अधिकारीच अडकले पूराच्या पाण्यात, लासलगावातील घटना

Subscribe

ग्रामीण रुग्णालयातून १२ जणांची सुखरूप सुटका

सलग २० तासांहून अधिक वेळ झालेल्या पावसाने लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तब्बल चार फूट पाणी साचले होते. त्यात ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि उपचार घेणारे १२ जण मंगळवारी रात्री अडकले होते. पाण्याचा जोर वाढत असल्याने सर्वजण रुग्णालयाच्या टेरेसवर उभे होते. सातत्याने सुरू असलेला जोरदार पाऊस तर खाली रुग्णालयाला नदीचे आलेले स्वरूप बघता अडकलेले नागरिक सुटकेसाठी प्रार्थना करत होते. या भागात वीज नसल्याने संपूर्ण परिसरात अंधार होता. याबाबत माहिती मिळताच सरपंच जयदत्त होळकर, वेदिका होळकर यांसह सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, विशाल पालवे, भैया नाईक, प्रतीक चोथानी आदींनी या सर्व अडकलेल्या १२ नागरिकांना अथक प्रयत्नांनी बाहेर काढले.

विंचूर : बंधारे फुटल्याने पिके पाण्यात

परिसरात जोरदार पावसामुळे गोई नदीवरील बंधारे फुटून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. गोई नदीवरील नाफेडजवळील बंधारा फुटून संपूर्ण पाणी प्रताप सागर बंधार्‍यात आल्याने, पाण्याच्या प्रचंड वेगाने प्रताप सागर बंधारा फुटला. त्यानंतर त्याखालील रानवड कारखान्याने बांधलेला बंधारा फुटून नदीला मोठा पूर आला. यामुळे नदीकाठी मोठी हानी झाली. जनावरे, कोंबड्या, शेती उपयोगी वस्तू वाहून गेल्या, याच भागातील शिव रस्ता वाहून गेला. अनेक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. शेतात पाणी आल्याने पिके वाहून गेली. मनोज शिंदे यांच्या दोन गाई, वासरू, दहा ट्रॉली शेणखत वाहून गेले. शरद खैरे यांच्याही ५० कोंबड्या, कृषी साहित्य वाहून गेले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -