
फूड फेस्टिव्हल’ला शनिवार (दि.८)पासून सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका हॉलमध्ये प्रकल्प संयोजक वैद्य विक्रांत जाधव, लायन्स क्लबच्या अध्यक्षा रितू चौधरी, विनोद कपूर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदींच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळपासूनच फूड फेस्टिव्हलमधील स्टॉलवर खवय्यांनी गर्दी केली. फेस्टिव्हलमध्ये नाशिकसह जळगाव, चाळीसगाव, सोलापूर येथून आलेल्या स्टॉलधारकांनी स्टॉल लावले आहेत. जळगावातील प्रसिद्ध कढी फुणकेच्या स्टॉलवर खवय्यांनी गर्दी केली होती. कधी एकदा फेस्टिव्हल सुरु होतो आणि आम्ही विविध लज्जतदार पदार्थांवर ताव मारतो, अशी तीव्र इच्छा खवय्यांमध्ये निर्माण झाल्याची दिसून आली. फूड फेस्टिव्हलचा आनंद आणखी व्दिगुणित करण्यासाठी आयोजकांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामुळे नावीन्यपुर्ण खमंग, चटपटीत खाद्यपदार्थांची चव चाखत असताना दुसरी स्पर्धेत सहभागी होता आले. फेस्टिव्हलमध्ये खवय्यांसाठी विविध भागातील लोकप्रिय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
फेस्टिव्हलचे आयोजक वैद्य विक्रांत जाधव यांनी सांगितले की, फूड बँकेच्या कार्याला जोड देण्यासाठी लायन्स फूड फेस्टिव्हल भरवण्यात आला आहे. लायन्स क्लबतर्फे फूड बॅक चालविले जाते. या माध्यमातून गरजूंना अन्न आणि धान्यपुरवठा केला. सामाजिक हेतूने आजोयित केलेल्या फूड फेस्टिव्हलमधून जमा होणारी रक्कम गरजूंसाठी वापरली जाणार आहे. फेस्टिव्हलमुळे नाशिककर खवय्यांनी खान्देश, विदर्भासह विविध भागातील लज्जतदार खाद्यपदार्थांची आस्वाद घेत खरेदी करण्याची संधी मिळाली, हा एका दुर्मिळ दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. फूड फेस्टिव्हलमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शनिवारी (दि.८) खापरावरील मांडे ही कार्यशाळा घेण्यात आली. रविवारी (दि.९) संपादकांच्या घरची आरोग्यदायी पाककृती हे विशेष चर्चासत्र व मुली व महिलांसाठी लांब केसांची स्पर्धा घेण्यात आली तर सोमवारी (दि.१०) ज्येष्ठ नागरिकांसाठी सुदृढ आजीआजोबा स्पर्धा होणार आहे.

खाद्यसंस्कृती रुजवणार्यांचा सत्कार
नाशिकमध्ये खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी खाद्यसंस्कृती रुजवून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा फेस्टिव्हलमध्ये सत्कार करण्यात आला. यामध्ये जुन्या नाशिकमधील सीताबाई मोरे (मिसळ), दिलीप वाघ (बुधा हलवाई,जिलबी), नूरमहंमद (दहीवडा), कॉलेज रोडवरील सलीम चहावाले, संतोष विसे (मकाजी चिवडा) यांचा सत्कार करण्यात आला.

खाद्यपदार्थांची मेजवानी
फूड फेस्टिव्हलमध्ये जळगावचे कढी फुणके, सुशिला, मांडे, स्पेशल नागली मॅगी, भाजणीचे थालपीठ, डाळीचे धिरडे, गाजर हलवा, ड्राय सॅन्डवीच, मेथीपुरी, वजन कमी करणारा पराठा, फ्रोजन डेझर्ट नसलेली प्युअर दुध व आईसस्क्रीम, सोलापुरी भाकरी, शेंगदाणा पोळी, बाजरीची कडक भाकरी या खाद्यपदार्थांचा खवय्यांनी आस्वाद तेही एकाच छताखाली घेतला. खाद्यप्रेमींसाठी हा लायन्स फूड फेस्टिव्हल पर्वणी ठरला.