अन् मीराबाई पवारांचं घराचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं

घरकुलासाठी मिळाले १ लाख 20 हजार

नाशिक : बागलाण तालुक्यातील पिंपळदर येथे मातीच्या घरात राहणार्‍या मीराबाई भुरसिंग पवार 20 ते 22 वर्षांपासून कुटुंब प्रमुख म्हणून सक्षमपणे घरगाडा चालवत आहेत. त्या शेतमजुरी करतात. मीराबाईंच्या कुटुंबात एक मुलगा व दोन मुली आहेत. कुटुंबाप्रती असलेली सर्व जबाबदारी निभावत असतांना त्यांनी पक्क्या घराचं स्वप्न पाहिलं होतं. पावसाळ्यात शेतमजुरी करून थकून घरी आल्यावर गळणारं घर पाहिलं की खूप त्रास व्हायचा आणि आपल पक्कं घर कधी होईल, असा विचार मनात यायचा. अशातच मीराबाईना पंतप्रधान आवास योजनेचा आधार मिळाला आणि त्यांचं स्वप्न खरं ठरलं.

घराच्या स्वप्नपूर्वीबद्दल मीराबाई भरभरुन बोलतात. त्या म्हणतात की, माझं जुनं घर मातीचं असल्याने पावसाळ्यात दमून-भागून घरी आल्यावर गळणारं घर आवरायचं, हा पावसाळ्यातला नित्यक्रमच होता. परंतू, पंतप्रधान आवास योजनेची माहिती मिळाली. त्यातून पक्क्या घरकुलासाठी १ लाख 20 हजार मिळाले. या पैशांतून मातीच्या घरातून स्वत:च्या हक्काच्या पक्क्या घरात प्रवेश केला. या घरकुलाच्या रकमेसोबत घर बांधताना मिळणार्‍या रोजगारासाठीचे 18 हजार रूपये, तसेच वैयक्तिक शौचालयासाठी 12 हजार रूपये शासनामार्फत मिळाले. याचप्रमाणे घरातील गॅस कनेक्शन, लाईट मीटर व नळ जोडणीदेखील शासनाच्या योजनांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं. घर दोन खोल्यांचं असलं तरी ते स्वत:च आणि पक्क घर झाल्याने मी खूप समाधानी आहे.

गेल्या 20-22 वर्षांपासून शेतमजुरी करणार्‍या मीराबाईंनी आपल्या दोन मुलींचे व एका मुलाच्या विवाहाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली. ते तिघेही आपापल्या संसारात सुखी आहेत. मातीच्या घरात असताना पावसाळ्यातच नव्हे, तर इतरही वेळेला सारखी घराची काळजी मीराबाईंना लागलेली असायची. शासनाने आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला हक्काचा निवारा देवून आमचं आयुष्य सुरक्षितदेखील केले आहे. शासनाच्या या योजनांचा लाभ मिळण्यासाठी मला गावपातळीवर सरपंच, ग्रामसेविका यांचे सहकार्य मिळाले. कुठलीही अडचण न येता माझ्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासनाने मला आधार दिला आहे. यासाठी मी शासनाची मनापासून ऋणी असल्याच्या भावना मीराबाईंनी व्यक्त केल्या.

शासनाच्या योजनांचा लाभ मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मीराबाईंना मिळाली होती. ही संधी म्हणजे माझ्यासारख्या शेतमजुरी करणार्‍या सामान्य महिलेसाठी खूप अभिमानाची आणि अविस्मरणीय गोष्ट असल्याच्या शब्दांत मीराबाईंनी आपल्या आनंदाला वाट करुन दिली. शासन गोरगरीबांसाठी विविध योजना राबवित असताना त्यांचा लाभ आमच्यासारख्या गरजू नागरिकांना प्रत्यक्ष मिळतो, यामुळे मी नक्कीच समाधानी आहे. तसेच, या योजना तळागाळातील गरजू नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्‍यांचेही त्यांनी ऋण व्यक्त केलेे.