घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहापालिकेच्या पंपिंग स्टेशनला अतिक्रमणांचा घेराव, मार्किंग करणार्‍या कर्मचार्‍यांना दमबाजी

महापालिकेच्या पंपिंग स्टेशनला अतिक्रमणांचा घेराव, मार्किंग करणार्‍या कर्मचार्‍यांना दमबाजी

Subscribe

भद्रकालीतील एसटीपी बनले अवैध धंद्यांचे केंद्र; स्थानिक व्यापारी त्रस्त

नाशिक : भद्रकाली टॅक्सी स्टँड येथे उभ्या असलेल्या महापालिकेच्या मलजलशुद्धीकरण प्रकल्प अर्थात एसटीपीलादेखील अतिक्रमणधारकांनी मोकळे सोडलेले नाही. अवैध धंद्यांचे केंद्र बनलेल्या या एसटीपीलगत हॉकर्स झोनचे मार्किंग करण्यासाठी गेलेल्या काही कर्मचार्‍यांना (दि.१) अतिक्रमणधारकांनी दमबाजी करत पिटाळून लावले. या प्रकारामुळे अतिक्रमणधारकांनी पालिकेला पुन्हा आव्हान दिल्याचे उघड झाले आहे.

दामोदर चित्रपटगृह ते दूध बाजार या मार्गावर (फाळके रोड) महावितरण कार्यालयासमोरील बाजूला भद्रकाली स्टँड परिसरात महापालिकेचे मलजलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्राच्या सभोवती मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. विशेष म्हणजे या केंद्राच्या भिंतीलादेखील कापड बांधून अतिक्रमणधारकांनी आपला धंदा मांडला आहे. यानिमित्ताने अतिक्रमण निर्मूलन विभागाचा किती वचक आहे, हेदेखील सिद्ध झाले आहे.

- Advertisement -

मलनिःस्सारण केंद्रालगत असलेल्या जनरेटरलगतच्या जागेचाही अतिक्रमणधारकांनी ताबा घेतला आहे. या ठिकाणी असलेल्या पत्र्याचे शेड, टपर्‍यांच्या माध्यमातून रात्रीच्या सुमारास अनधिकृत व्यवसाय चालतात. याच ठिकाणी असलेल्या ऑम्लेट आणि इतर खाद्यपदार्थांच्या अनधिकृत गाड्यांवर मद्यविक्रीदेखील होते. दिवसा हे ठिकाण भुरटे चोरटे, पाकिटमारांचा अड्डा असते. एसटीपीचा ठेका हा खासगी व्यक्तीकडे असल्याने त्याचे कर्मचारी असून नसल्यासारखे असतात. कोरोना काळात हटविलेली ही अतिक्रमणे पालिकेने पुन्हा काढून टाकावीत, अशी मागणी स्थानिकांनी केली.

एकेकाळचे वैभव कालांतराने झाले बदनाम

कधीकाळी पंचवटी, रविवार कारंजा, भद्रकाली या भागातच प्रमुख बाजारपेठ होती. त्यामुळे रविवार कारंजावरुन इतरत्र जाण्यासाठी टांगे उपलब्ध असत. नाशिकरोडला जाण्यासाठीदेखील फाळके रोड, द्वारका हा प्रमुख मार्ग होता. नंतरच्या काळात सीबीएस होण्यापूर्वी सध्याच्या टॅक्सीस्टँडच्या जागेत बसस्टँड होता. नाशिक-भगूर मार्गासाठी येथूनच बससेवा उपलब्ध होती. एकेकाळचे वैभव असलेला हा मार्ग द्वारका-मुंबईनाका-अशोकस्तंभ-रविवार कारंजा असा जुना आग्रा महामार्ग झाल्यानंतर मागे पडला आणि बदनाम झाला. आजही विकासापासून हा भाग दूरच आहे.

- Advertisement -

दोन नंबरचे धंदे

या ठिकाणी सर्वप्रकारचे दोन नंबरचे धंदे चालतात. दिवसा चोरीछुपे आणि रात्री हा प्रकार बिनधास्त असतो. विशेष म्हणजे पाकिटमार, चेनस्नॅचर, वेश्या आणि अतिक्रमणधारकांची साखळीच तयार झाली आहे. हे सर्व एकमेकांच्या संगनमताने ग्राहकांची लूट करत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -