घरमहाराष्ट्रनाशिकओझर : बारागाड्या ओढण्यासाठी मैदान तयार; यंदा धुमधडाक्यात यात्रोत्सव

ओझर : बारागाड्या ओढण्यासाठी मैदान तयार; यंदा धुमधडाक्यात यात्रोत्सव

Subscribe

ओझर : जेजुरीनंतरची उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी यात्रा, अशी ख्याती असलेल्या ओझरचे ग्रामदैवत खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदाचा हा पहिलाच यात्रोत्सव असल्याने भाविकांसोबतच ओझरकरदेखील यात्रा धुमधडाक्यात साजरी करणार आहे. ग्रामदैवत श्रीखंडेराव महाराज यात्रोत्सव आज मंगळवारी (दि. २९) सुरू होत आहे. पाच दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे अश्व बारागाड्या ओढतो आणि चालत्या फिरत्या गाड्यांवर फिरणार्‍या सोंडग्यांवर पिळदार चमचमणारे शरीर असलेले मल्हार मल्ल कसरती करतात. भंडारा आणि खोबर्‍याच्या उधळणीने परिसर सोनेरी होऊन जातो. २००-२५० वर्षांची परंपरा पाहण्यासाठी ओझर परिसरातील ४० वाड्यावस्त्यांचे ग्रामस्थ हे दृश्य डोळ्यांत साठवून खंडेरावाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावतात.

नगर परिषद कर्मचारी यांनी यात्रा मैदानात जेसीबीचा वापर करत बारागाडे ओढण्यासाठी मैदान तयार केले आहे. मानकरी आपापल्या गाड्यांची रंगरंगोटी व सजावट करून गाडे धुमधडाक्यात यात्रा मैदानावर घेऊन येणार आहेत. यात्रोत्सवात चक्रीपासून रहाटपाळणा ते भूलभुलय्या, मौत का कुआँ आदी मनोरंजनात्मक खेळांसाठी व अनेक दुकानदारांसाठी योग्य जागा मिळावी, यासाठी नगर परिषद कर्मचारी, यात्रा कमिटीने यात्रेच्या १५ दिवस आधी परिश्रम घेऊन नियोजन केले आहे. यात्रा आणि ओझरचा आठवडे बाजार एकाच दिवशी असल्यामुळे गर्दी देखील वाढणार आहे.

- Advertisement -

यात्रेच्या आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील नामवंत तमाशा मंडळे आपली कला सादर करणार आहेत, तर दुसर्‍या दिवशी मंदिर परिसरात याच तमाशा मंडळाच्या हजेरीचा कार्यक्रम होतो. माजी आमदार अनिल कदम, यतीन कदम, मर्चंट्स बँकेचे चेअरमन राजेंद्र शिंदे, यात्रा कमिटी अध्यक्ष धनंजय पगार, खजिनदार प्रशांत चौरे, सहखजिनदार अशोक शेलार, शिवाजी शेजवळ, कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, सतीश पगार, परशराम शेलार, संजय भडके आदींसह बारागाडे मानकरी व ग्रामस्थ नियोजनात परिश्रम घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -