घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनोंदणीचे काम बाकी आहे घाबरू नका, मार्च अखेरमुळे दस्त नोंदणी कार्यालय रामनवमीलाही...

नोंदणीचे काम बाकी आहे घाबरू नका, मार्च अखेरमुळे दस्त नोंदणी कार्यालय रामनवमीलाही सुरू राहणार

Subscribe

नाशिक : शासकीय कर्मचार्‍यांनी केलेला सलग सात दिवसांचा संप आणि मार्चअखेर यामुळे मालमत्ता खरेदी-विक्रीच्या दस्त नोंदणीसाठी नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालयांत गर्दी होत आहे. त्यामुळे गुरूवार (दि.३० मार्च) रामनवमी निमित्त सुटी असूनही प्रलंबित दस्तांची संख्या बघता दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी सांगितले.

राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा नोंदणी व मुद्रांक विभाग हा दुसर्‍या क्रमांकाचा विभाग आहे. चालू बाजार मूल्यदराचे (रेडीरेकनर) नवे दर १ एप्रिलपासून लागू होतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक दस्तनोंदणी होते. तसेच सर्वाधिक महसूलही मार्च महिन्यातच जमा होतो. जमीन, सदनिका, दुकाने आदींच्या दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी होताना दिसत आहे. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी संप केल्याने १४ ते २० मार्च या काळात दस्त नोंदणीची कार्यालये बंद होती.

- Advertisement -

आता स्थिती पूर्ववत झाली असून मार्च अखेरपर्यंत व्यवहार पूर्ण करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. मागील दोन वर्षात शासनाने रेडीरेकनरचे दर वाढवले नाहीत. नवीन आर्थिक वर्षात ते वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अनेक जण भूर्दंड टाळण्यासाठी तातडीने दस्त नोंदणी करू लागले आहेत. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांत गर्दी वाढलेली दिसते. बांधकाम व्यावसायिकांच्या मते नव्या आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर वाढू शकतात. एकदा स्टॅम्प डयुटी भरल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत दस्ताची नोंदणी करता येते. त्यामुळे दस्त नोंदणी करता गर्दी दिसून येत आहे.

गुरूवार (दि. ३०) रोजी श्रीराम नवमीची शासकीय सुटी जरी असली तरी दस्त नोंदणी कार्यालये मात्र सुरूच राहणार आहेत. नाशिक शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग २, नाशिक १ व सह दुय्यम निबंधक वर्ग २ नाशिक ७ आणि मालेगाव शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग २, मालेगाव १ ही कार्यालये गुरूवारी सुरू राहतील असे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी कळविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -