घरमहाराष्ट्रनाशिकशरद पवारांनी दिली हेमंत गोडसेंना विमानात लिफ्ट..

शरद पवारांनी दिली हेमंत गोडसेंना विमानात लिफ्ट..

Subscribe

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; पुढील प्रवासाकडे सर्वांचे लक्ष

नाशिक:राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रत्येक कृतीमागे काही अर्थ दडलेला असतो असे म्हटले जाते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशकात आलेल्या पवारांनी दिल्लीला जाताना चक्क खासदार हेमंत गोडसे यांना विमानात लिफ्ट दिली. या प्रवासादरम्यान पवारांनी गोडसेंची राजकीय कारकिर्दही जाणून घेतली. हा विमान प्रवास दिल्ली विमानतळापर्यंत आणि तेथून पुढे चारचाकीने संसदेपर्यंत झाला असला तरी खा. गोडसेंचा पुढील प्रवास नक्की कोणत्या दिशेने असेल याविषयीच्या चर्चांनाही यानिमित्ताने उधाण आले आहे.

आजपर्यंत आपण अनेकांना दुचाकी, चारचाकीवर लिफ्ट देतांना पाहिले असेल. पण थेट विमानातून लिफ्ट देतांना आपण कुणाला पाहिलय का? नाही ना? मात्र खासदार हेमंत गोडसे यांना हा अनुभव आला. अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी खा. शरद पवार नाशिक दौर्‍यावर होते. संमेलन समारोपाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर खा. गोडसे हे पवारांना ते मुक्कामी असलेल्या ठिकाणी भेटण्यासाठी गेले. नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नावर चर्चा झाल्यानंतर औपचारीक गप्पा मारत असतांना गोडसेंनी आपण उद्या दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले. हे ऐकताच पवारांनी आपणही उद्या दिल्लीला जाणार असल्याचे सांगत चला मग, सोबतच जाऊयात की ! असे निमंत्रणच गोडसेंना दिले.

- Advertisement -

ठरल्यानुसार सोमवारी सकाळी खा. गोडसे दुपारी १ वाजता विमानतळावर दाखल झाले. परंतु काही कारणास्तव विमानाला उशिर झाल्याने त्यांना सुमारे पाऊणतास उशिर झाला. त्यामुळे मिळालेल्या कालावधीत पवारांनी गोडसेंकडून ओझर विमानतळाहून सुरू असलेल्या विमानसेवांबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास शरद पवार, खा.हेमंत गोडसे, खा.श्रीनिवास पाटील हे तिघे विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत विमानतळावर उतरल्यानंतरही पवार खा. गोडसेंना आपल्या गाडीतून संसदेपयर्र्ंत सोबत प्रवास केला. पवारांच्या प्रत्येक कृतीत काही ना काही अर्थ दडलेला असतो. त्यामुळे या विमानप्रवासातूनही आता गोडसेंचा प्रवास कोणत्या दिशेने होते हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीकडे वाटचाल?

खासदार हेमंत गोडसे यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत छगन भुजबळ यांना एक लाख मतांच्या फरकाने पराभूत केले होते. त्यापूर्वी त्यांनी तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांना पराभूत केले होते. या दोन्ही पराभवांनंतर आता भुजबळ कुटुंबातील सदस्य लोकसभा निवडणुकीला उमेदवारी करतील याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे सद्यस्थितीत राष्ट्रवादी सक्षम उमेदवाराच्याही शोधात आहे. हा शोध हेमंत गोंडसेंपर्यंत येऊन थांबणार तर नाही ना अशी चर्चा पवारांच्या सहप्रवासाच्या निमित्ताने सुरु झाली आहे. प्रवासादरम्यान, पवारांनी खा. गोडसेंची जी आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीबाबत माहिती जाणून घेतली ते बघता या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -