घरमहाराष्ट्रनाशिकस्टार प्रचारक अडकले मतदारसंघात!

स्टार प्रचारक अडकले मतदारसंघात!

Subscribe

सभेसाठी राजकीय पक्षांना मिळेना तारखा, स्टार प्रचारक अन्य जिल्हयात जाऊन भाषणबाजी करण्यापेक्षा स्वतःच्याच मतदारसंघात अडकून पडलेत.

निवडणूक म्हटले की प्रचार येतोच. प्रचारात आरोप प्रत्यारोपही होतात. अशा पध्दतीने झालेल्या प्रचाराची चर्चाही चांगली रंगते. त्यामुळे शेलक्या शब्दांत बोलणार्‍या, टोकदार भाषण करणार्‍या नेत्यांना प्रचारात सहभागी होण्यासाठी मागणी असते. मात्र सध्याची राजकिय स्थिती वेगळी आहे. त्यामुळे हे स्टार प्रचारक अन्य जिल्हयात जाऊन भाषणबाजी करण्यापेक्षा स्वतःच्याच मतदारसंघात अडकून पडल्याचे दिसते. त्यामुळे राजकीय पक्षांना या स्टार प्रचारकांच्या सभेच्या तारखा मिळत नसल्याने घरोघरी जाउन प्रचार करण्यावरच भर द्यावा लागतो आहे.

राज्यात सध्या महायुती विरोधात महाआघाडी असा सामना रंगत असून वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांनीही अनेक ठिकाणी आव्हान दिले आहे. त्यातच भाजपकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते धास्तावले आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात आपल्या प्रचार सभांमधून चांगलीच राळ उडवल्याने भाजप, सेना महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे केवळ एका सभेत आपल्यावर केलेल्या आरोपांना दुसर्‍या सभेत प्रतिउत्तर देणे इतकाच अजेंडा सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या सभांमधून दिसून येते. त्यामुळेच की काय, प्रचारातून जनहिताचे मुददेच गायब झाल्याचे दिसत आहे. निवडणुका म्हटल्या की, वातावरण निर्मितीसाठी स्टार प्रचारकांची गरज असते. याकरीता प्रत्येक राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात येते. मात्र यंदा सर्वच राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात आलेले बहुतांश स्टार प्रचारक घरच्याच मैदानात बॅटिंग करण्यातच अडकले आहेत. माझं मला कळेना, तुझं कधी बघू अशी प्रचारकांची अवस्था झाली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आदि स्टार प्रचारक आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात नाशिकमध्ये तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ उमेदवार असल्याने स्वतः भुजबळ नाशिकमध्येच तळ ठोकून आहेत. त्यामुळे राज्यात इतर उमेदवारांच्या प्रचाराला हजेरी लावतांना त्यांना नाशिककडे लक्ष देतांनाही कसरत करावी लागत असल्याचे दिसते. तीच गत अजित पवारांच्याबाबतीत आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने तसेच सुप्रिया सुळे याही बारामती निवडणुक रिंगणात असल्याने या दोघांच्या प्रचाराची धुरा अजित पवारांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सभा घेण्यासाठी अजित पवारांकडून अद्याप तारीख देण्यात आलेली नाही. सुप्रिया सुळे याही आपल्या मतदारसंघात प्रचारात गुंतल्या आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार दोन ते तीन वेळा नाशिकमध्ये येउन गेले. भाजपकडून स्मृती इराणी, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राम शिंदे हे स्टार प्रचारक आहेत. मात्र गडकरी, इराणी या आपल्या मतदारसंघात प्रचारात व्यस्त आहेत.

महाजनांसमोर सध्या भाजपांतर्गत निर्माण झालेली बंडाळी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहेत. तर मुख्यमंत्री पंतप्रधानांबरोबर सभांना हजेरी लावत आहेत. राम शिंदे हे अहमदनगर मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारात आहेत. सेनेकडून केवळ खासदार संजय राउत यांनी नाशिकमध्ये सभा घेतली. नाही म्हणायला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिकमध्ये संयुक्त मेळावे घेतले मात्र त्यावेळी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या नेत्यांच्या संयुक्त सभांची मागणी होउ लागली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवार नसल्याने काँगे्रेस नेत्यांनी या मतदारसंघाकडे पाठच फिरवल्याचे दिसून येते. जनतेवर आपल्या भाषणाने प्रभुत्व ठेवून असलेले नेतेच आपापल्या मतदारसंघात प्रचारात अडकून पडल्याने इतर मतदारसंघात मात्र राजकिय पक्षांची भिस्त स्थानिक नेत्यांवरच अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

राधाकृष्ण विखेंच्या सभांना मागणी नाही

राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत जरी सामाविष्ट केले गेले असले तरी, राज्यातून त्यांच्या सभांना मागणी नसल्याचे दिसून येते. नगरमध्ये त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे भाजपकडून उमेदवारी करत आहेत. विखे पाटील हेही मुलाच्या प्रचारासाठी भाजपच्या व्यासपीठावर जाउ लागल्याने त्यांचीही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच की काय त्यांच्याविषयी काँगे्रसमध्ये नाराजीचा सुर आहे. इतकंच नव्हे तर आघाडीच्या बॅनरवरून विखेंची छबीही गायब झाल्याचे दिसून येते.

मोदी, ठाकरें, गांधींच्या सभांना मागणी

नाशिकमध्ये मोदींच्या सभेला मागणी आहे. गत पंचवार्षिक निवडणूकित नाशिकमध्ये तपोवनात मोदींची सभा घेण्यात आली ही सभा भाजपच्या विजयासाठी टर्निंग पॉईंट ठरली त्यामुळे यंदाही मोदींची नाशिकमध्ये सभा व्हावी अशी मागणी आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी पिंपळगाव येथे सभा घेण्याचे घाटत आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरेंच्या सभांसाठी महाआघाडीकडून मागणी वाढत आहे. राज यांच्या भाषणाचे तरूणाईत क्रेझ आहे. मोदी आणि शहांविरोधात त्यांनी मोहीम उघडली असून एकेकाळचा मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या सभेसाठी आग्रह धरण्यात आला आहे. मोदींच्या सभेनंतर ही सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तर आघाडीकडून काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संयुक्त सभेचे नियोजनही सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -