घर महाराष्ट्र नाशिक लष्करी अळी करतेय मका फस्त, कृषी विभाग मात्र सुस्त; शेतकरी त्रस्त

लष्करी अळी करतेय मका फस्त, कृषी विभाग मात्र सुस्त; शेतकरी त्रस्त

Subscribe

नाशिक : बागलाण तालुक्यातील बळीराजांचे व्यापारी पीक म्हणून ओळख असलेल्या मका पिकाला चालू खरीप हंगामात अत्यल्प पाऊस व लष्करी अळीचे ग्रहण लागले असल्याने मका पिक संकटात सापडले आहे. अत्यल्प पाऊसामुळे मका पिक कसे बसे तग धरून आहे त्यातच गेल्या दहा बारा दिवसापासून या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बळीराजांना औषध फवारणी करणे क्रमप्राप्त झाले आहे. दरवर्षी कृषी विभाकडून सवलतीच्या दरात देण्यात येत असलेले कीटकनाशक चालू वर्षांत अदयाप पर्यंत प्राप्त झाले नसून ते कधी येईल याबाबत कृषी विभागाकडून कोणतीही माहीती दिली जात नसून त्याबाबत अनभिज्ञात पाळली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. लष्करी अळीचा वेळीच बंदोबस्त झाला नाही तर मका पिकाच्या येणा-या सरासरी उत्पादनात मोठी घट निर्माण होणार आहे.

चालू खरीप हंगामातील मृग नक्षत्र संपूर्णात कोरडे केले. निम्मे आर्द्र नक्षत्र ही कोरडे गेले होते आर्द्र नक्षत्राच्या उत्तरार्धात भिज पावसावर तालुक्यातील काही भागात खरीप हंगामातील पेरणीला सुरूवात करण्यात आली होती. रब्बी हंगामातील गारपीट, कांद्याचे दिवसेंदिवस कोसळत असलेले बाजारभाव या सर्वाला सोडचिठ्ठी देत खरीपाची पेरणी उरकण्यात आली होती. चालू हंगामात रासायनिक खते, बि-बियाणे यांच्या बाजार भावात वाढ करण्यात आली होती. हात उचल करत बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयातील भागात मका, सोयाबीन,पिकांची पेरणी करण्यात आली. पेरणी झाल्यानंतर दीड महिन्यांपासून पावसाने या भागात दडी मारली होती. दोन दिवसापूर्वी रिमझिम पावसाने परिसरात हजेरी लावण्याने पिकांच्या आतील मशागतीच्या कामाना वेग आला आहे.

- Advertisement -

पिकाना नत्र पुवठयासाठी युरिया लावण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू झाली आहे. याला ही व्यापारी वर्गाकडून खोडा घातला जात असून कुत्रीम युरिया टंचाई निर्माण करून मागच्या दाराने महागड्या दरात युरिया विक्री केली जात आहे. परिसरात अदयाप पर्यंत मोठा पाऊस झाला नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. मका पिकावर गेल्या पाच सहा दिवसापासून लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला असून जमिनीत असलेल्या पिकाला या अळी कडून लक्ष केले जात आहे. तिचा वेळीच बंदोबस्त झाला नाही तर या अळीचा प्रादुर्भाव वाढून खरीप हंगामातील पिवळे सोने या अळीच्या भक्ष्य स्थानी पडून मका पिकाच्या येणा -या उत्पादनात घट निर्माण होण्याची भिती कृषीतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

दरवर्षीला या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून सवलतीच्या दरात ईमॅमॅक्टिन बेंझोएट 5% एस.जी. कीटकनाशक शेतक-यांना गावोगावी कृषीसहाय्यकांच्या मदतीने वितरीत करण्यात येत होते. यामुळे शेतक-यांना खाजगी दुकानातून महागडया दरात मिळणा-या कीटकनाशक खरेदीतून सुटका होवून आर्थिक फायदा होत होता. पण चालू वर्षांत अदयाप पर्यंत या कीटकनाशकाचे वाटप करण्यात आले नसून याबाबत शेतकर्‍यांकडून कृषी कर्मचारीवर्गाला याच्या पुरवठ्याबाबत विचारणा केली जात आहे. पण पुरवठा कधी होईल याबाबत कोणतीही माहीती दिली जात नसून तालूका कृषी अधिका-यांकडून दूरध्वनीवरून माहीती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे अनूभवास आले आहे. लवकरच कृषीविभाकडून सवलतीच्या दरात हे कीटकनाशक दिले नाही तर लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्‍यांना खाजगी कृषी सेवा केंद्रातून महागडया दरात हे कीटकनाशक खरेदी करावे लागणार असल्याचे विदारक चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

- Advertisement -

आधीच मार्च एप्रिल महिन्यात झालेल्या गारपीट ने शेतकरी वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी हातउचल, कर्जाऊ रक्कमा घेवून पेरणी केली आहे. हातातील सारी आर्थिक पुंजी खरीप हंगाम पेरणीवर खर्च केली आहे. तालूक्यात यंदा पावसाने दडी मारली असून खरीप हंगामातील पिकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे त्यातच कसेबसे जगवलेल्या पिकावर लष्करी अळीच्या रूपाने नवीन संकट दत्त म्हणुन उभे ठाकले आहे. लष्करी अळीचा वेळीच बंदोबस्त झाला नाही तर आज थोडक्यात दिसत असलेला प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढण्यास वेळ लागणार नसल्याचा पुर्वनूभव तालुक्यातील बळीराजांच्या पाठीशी आहे. कृषीविभागाने लवकरात लवकर या कीटकनाशकाचे वितरण करावे अशी मागणी बळीराजांकडून केली जात आहे.

बागलाण तालुक्यात पेरणी झालेले क्षेत्र… 

  • मका : 36205.00 हे.
  • सोयाबीन : 2987.00 हे.
  • बाजरी : 11156.00!हे.
  • ज्वारी : 15 हे.
  • मृग : 637.00 हे.
  • उडीद : 264.00हे
- Advertisment -