घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रथ्री-डी प्रिंटेड अन् रंग बदलणार्‍या ’मॅजिकल’ छत्र्यांची क्रेझ

थ्री-डी प्रिंटेड अन् रंग बदलणार्‍या ’मॅजिकल’ छत्र्यांची क्रेझ

Subscribe

निता महाले । नाशिक

पावसाचे थेंब पडताच रंग बदलणार्‍या मॅजिकल छत्र्या, थ्री-डी प्रिंटेड आणि कार्टून्स कॅरेक्टर प्रिंटेड छत्र्यांनी यंदाचा पावसाळा रंगतदार आणि तितकाच आकर्षक केलाय. विशेष म्हणजे खिशात मावणारी कॅप्सुल आणि बाटलीच्या आकारातील छत्र्यांनाही यंदा चांगलीच मागणी आहे. मात्र, छत्र्यांच्या किंमतीत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाल्याने खरेदीच्या आनंदावर काहीसे पाणी फेरले गेले आहे.

- Advertisement -

पावसाळ्याला सुरुवात होताच घरात ठेवलेल्या छत्र्यांची शोधाशोध सुरू होते. बच्चेकंपनीला शाळेत जाण्यासाठी तर गृहिणी अथवा नोकरदार वर्गाला दैनंदिन कामासाठी छत्री गरजेची असते. त्यामुळेच दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर छत्र्यांना चांगलीच मागणी असते आणि या मागणीनुसार, ग्राहकांची आवड लक्षात घेऊन वेगवेगळ्या आकार, रंग आणि प्रकारातील छत्र्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. छत्री विक्रेत्या दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक दुकानातून दररोज सरासरी ४०० ते ५०० छत्र्या विकल्या जात आहेत.

प्रिंटेड छत्र्यांना तरुणींची पसंती

पुरुषांकडून काळ्या रंगाच्या छत्र्यांना पसंती दिली जात असली तरीही, अलिकडे काहीसा ट्रेंड बदलताना दिसत आहे. त्यातही रंग बदलणार्‍या, थ्री-डी आणि प्रिंटेड छत्र्यांना तरुणींची अधिक पसंती मिळते आहे. गुलाबी, गर्द लाल, पिवळा, आकाशी अशा विविध रंगांमध्ये या छत्र्या उपलब्ध आहेत. साधारण २०० ते ८०० रुपयांदरम्यान यांच्या किंमती आहेत. थ्री-डी छत्रीची किंमत एकरंगी छत्रीपेक्षा अधिक असली तरीही त्यावरील डिझाईन आणि रंगसंगती, त्यावरील चित्र हे प्रत्यक्ष समोर असल्याचा भास होतो. अशा छत्र्यांवर फुलांची डिझाईन असेल तर ही फुलं प्रत्यक्ष समोर असल्यासारखं वाटतं.

- Advertisement -

पाणी पडताच बदलतो रंग

गरम पदार्थ टाकताच चित्र उमटणारे कप किंवा मग बाजारपेठेत चांगलेच ट्रेंडिंग आहेत. याचप्रमाणे आता पाणी पडताच रंग बदलणार्‍या छत्र्यांचीही तरुणाईत मोठी क्रेझ आहे. रंग बदलणार्‍या या छत्र्या नाशिकच्या बाजारपेठेत अद्याप उपलब्ध झालेल्या नसल्या तरीही ऑनलाईन साईट्सवर मात्र त्या उपलब्ध आहेत. त्यांना मागणीही मोठ्या प्रमाणावर आहे. या छत्र्यांच्या किंमती सुमारे ८०० ते एक हजार रुपयांदरम्यान आहेत.

जोरदार वार्‍याचा सामना करणार्‍या ’गस्टबस्टर’

घडी करता येणार्‍या छत्र्या जोरदार वारा आला की बाहेरच्या बाजूने फोल्ड होतात किंवा आतील तारा तुटतात. यावर मात करण्यासाठी यंदा जोरदार वार्‍यातही टिकाव धरू शकतील अशा गस्टबस्टर छत्र्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. वार्‍याचा सामना करण्यासाठी लवचिक आणि तितक्याच मजबूत फ्रेम, उच्च प्रतीची सामुग्री यात वापरलेली असते. शहरातील मेनरोड, दहीपूल, शालिमार, तिबेटियन मार्केट, कॉलेजरोडसह उपनगरांमध्ये या छत्र्यांना मोठी मागणी आहे. भिवंडी, मुंबई, उल्हासनगर या ठिकाणाहून या छत्र्या आणल्या जातात. सुमारे ४०० ते ६०० रुपयांदरम्यान या छत्र्या उपलब्ध आहेत.

अशा आहेत किंमती

  • बूम छत्री (ट्रान्सपरंट) : ४०० ते ६००
  • पारंपरिक छत्री : २५०
  • लहान मुलांच्या छत्र्या : २५० ते ४००
  • गांधी छत्री : २०० ते ४००
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -