घरमहाराष्ट्रनाशिकविठेवाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने काटेरी झुडूपांचा अडसर केला दूर

विठेवाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने काटेरी झुडूपांचा अडसर केला दूर

Subscribe

विठेवाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

खामखेडा : देवळा तालुक्यातील विठेवाडी-देवळा मार्गावर ठिकठिकाणी अपघातास कारणीभूत ठरणार्‍या काटेरी झुडुपांचा अडसर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने दूर केला. जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्‍या विठेवाडी-देवळा रस्त्यावर विठेवाडी आणि झिरेपिंपळदरम्यानचा रस्ता ठिकठिकाणी काटेरी झुडुपांच्या विळख्यात हरवला होता. दिवसभर वर्दळ असलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी काटेरी झुडुपे, बाभळीची झाडे रस्त्यावर आल्याने अपघाताच्या घटनांत वाढ झाली होती. काटेरी झुडुपांमुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचार्‍यांना त्रास सहन करावा लागत होता.

या मार्गावरून शेकडो वाहने ये-जा करतात. हा रस्ता तालुक्याला जोडणारा असल्याने वाहनांची वर्दळ असते. परंतु रस्ता अरूंद आणि त्यात काटेरी झुडुपांनी वेढलेला असल्यामुळे वळण मार्गावर लहान-मोठे अपघात होत होते. झुडुपांमुळे समोरून येणारे वाहनच नजरेस पडत नव्हते. तसेच, दोन वाहने एकाचवेळी आल्यास थेट काट्यांचा सामना करावा लागत होता. झाडांचा त्रास वाढत असल्याने संबंधित विभागाने तत्काळ काटेरी झुडुपे काढावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष केले.

- Advertisement -

गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण निकम, स्वप्निल निकम, अभिजित निकम, राहुल निकम, ईश्वर निकम, अरुण निकम, तेजस निकम, ललित निकम आदींनी एकत्र येऊन स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने अपघातास कारणीभूत ठरणारी काटेरी झुडुपे हटवत रस्त्याचा श्वास मोकळा केला. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. तरुणाईच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -