घरमहाराष्ट्रनाशिकआहार, विहार, मनाची सांगड घाला

आहार, विहार, मनाची सांगड घाला

Subscribe

लायन्स क्लब सभागृहात जागतिक आरोग्यदिनानिमित्त आयोजित विशेष आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमात उमटला सूर

नाशिक आरोग्याबाबत बहुतांश लोक जागरूक झाले आहेत. मात्र, विचार आणि कृती यात अंतर पडत असल्याने स्थिती बदलत नाही. शाश्वत आरोग्यासाठी आरोग्यदायी शैली स्विकारा. आपल्या शरीराचे मनाचे ऐका. आहार, विहार आणि मनाची सांगड घाला. असा सूर रविवारी ७ एप्रिलला येथील लायन्स क्लब सभागृहात जागतिक आरोग्यदिनानिमित्त आयोजित विशेष आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमात उमटला. ‘आपलं महानगर’, लायन्स क्लब पंचवटी, नाशिक आणि प्रज्ञाज फिटनेस अ‍ॅण्ड हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य विक्रांत जाधव, पुणे येथील व्याख्याते विनय सातपुते, फिटनेस कन्सल्टंट प्रज्ञा भोसले-तोरसकर, गोदावरी बँकेच्या अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, अवकाश शास्त्रज्ञ अपूर्वा जाखडी यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर लायन्स क्लबचे अध्यक्ष अरुण अमृतकर, लायन्स क्लबच्या सचिव रितू चौधरी, लायन्स क्लबचे वरिष्ठ सदस्य ओमप्रकाश पेठे, ‘आपलं महानगर’चे निवासी संपादक मिलिंद सजगुरे उपस्थित होते.

‘म्युझिकल फिटनेस’ची अनुभूती

म्युझिकल फिटनेस एक्सझरसाईज या विषयावर फिटनेस कन्सल्टंट प्रज्ञा भोसले-तोरसकर यांनी संवाद साधला. म्युझिकल फिटनेसमध्ये झुंबा, फोर फिटनेस, पिलाटीस हे मिक्सर आहेत. यामध्ये चिमुकल्यांपासून वयोवृद्धांसाठीही अगदी सोप्या टिप्स असल्याचे भोसले म्हणाल्या. त्यानंतर भोसले यांनी म्युझिकल फिटनेसची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानुसार उपस्थितांनी संगीताच्या तालावर व्यायाम केला. सर्वांना साध्या, सोप्या पण दैनंदिन वेळापत्रकात नसलेल्या प्रात्यक्षिकांचा अनोखा अनुभव मिळाला. जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्ताने आता म्युझिकल फिटनेस एक्सझरसाईज नित्यनेमाने करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांना केला.

- Advertisement -

ऋतूमानानुसार आहार बदला

वैद्य विक्रांत जाधव म्हणाले, प्रत्येक ऋतूमानानुसार आहारात बदल करणे आवश्यक आहे. मेथी, पनीर या सारख्या भाज्या या सरसकट सर्वांच्या आहारात घेतल्या जातात. त्याबाबतीत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच कृती करणे आवश्यक आहेत. बंद खोलीत स्वत:ची स्वतंत्र ‘ब्रिदिंग स्पेस’ निर्माण करा. वातावरण शद्ध करणार्‍या कितीतरी चांगल्या वनस्पती उपलब्ध आहेत. त्यांचा वापर घरात करावा. सण आणि उत्सवात आहारशास्त्राचा समावेश केलेला आहे. त्याकडे जागरुकतेने पहावे. श्रीखंड उन्हाळ्यात खाणे हे चांगले असते. ते शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. मात्र श्रीखंड खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. आहार, विहार आणि मन यांची सांगड घाला.

प्रकृती ओळखून आरोग्य संवर्धन करा

विनय सातपुते म्हणाले, युनेस्कोने २०१२ पासून आरोग्यात वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स संकल्पनेचा समावेश केला आहे. जागतिक पातळीवर झालेल्या सर्व्हेत फिनलँड, डेन्मार्क, नॉर्वे, आईसलँड हे देश हॅपिनेस इंडेक्समध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहेत. या क्रमवारीत भारताचा क्रमांक हा १३३ वा आहे. पाकिस्तान ७५ तर चीन ८६ व्या स्थानावर आहे. म्हणजे शरीर व मनाचे आरोग्य होय. आरोग्य संवर्धनाचे प्रकार खूप आहेत. मात्र, माझ्यासाठी कोणता योग्य हे प्रत्येकाने आपापली प्रकृती ओळखून ठरवले पाहिजे. तुमच्या कामाचं स्वरूप पाहूनच तुम्ही तुमच्या आहाराचे नियोजन करा. ज्याला जमेल त्यांनी जिमला जावे. योग हा प्रत्येक घटकाला उपयुक्त आहे. प्रत्येकाचे शरीर वेगळं आहे. त्यानुसार स्वत:ची चिकित्सा करूनच आरोग्य संवर्धनाचे प्रयत्न करावेत. तंत्रज्ञानाचा आरोग्य संवर्धनासाठी उपयोग होतो. आपले शारीरिक रिपोर्ट्स अ‍ॅपमध्ये ठेवावेत. मेंटल फिटनेसवर भर द्यावा. ओशो, श्री श्री रविशंकर यांसारख्या अध्यात्मिक गुरूंचे विचार आठवड्यातून एकदा ऐका. यातून बुद्धीला चांगले खाद्य मिळेल. तुमचा बॉडी मास इंडेक्स, मसल फॅट रेशो याबाबत जागरूक रहा. आपले व्यक्तिगत, सामाजिक आणि व्यावसायिक नातेसंबंध सुदृढ राहतील यावर भर द्या. पक्के, कच्चे आणि लुच्चे असे लोकांचे ४ प्रकार आहेत. यातील पहिल्या कॅटेगरीतील लोक हे तुलनेने अधिक समृद्ध जीवन जगतात. मी कोणत्या कॅटेगरीत आहे हे ज्याने त्याने ठरवावे. दिवसाची सुरुवात आपल्याला मिळालेल्या गोष्टींविषयीच्या कृतज्ञतेने करावी.

- Advertisement -

गावाचं आरोग्य जपणं महत्त्वाचं

अमृता पवार म्हणाल्या, वास्तुविशारद आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही पातळ्यांवरून मी आरोग्य या संकल्पनेकडे पाहते. आपण जे काही करतो त्यात शरीर, आरोग्य आणि आत्मा या तिन्हींचा संतुलन साधणे महत्त्वाचे असते. केवळ व्यक्तिचं नव्हे तर संपूर्ण समाजाचं आरोग्यही महत्त्वाचं असतं. गावाचा हॅपिनेस इंडेक्सही महत्त्वाचा आहे. पाणी, वीज, रस्ते एवढ्यापुरतीच लोकप्रतिनिधींची जबाबदारी नसते. तर ज्या भागात काम करतो त्या भागाचे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी माझ्या कार्यक्षेत्रात बरीच आरोग्यविषयक शिबिरे घेतली. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात मुतखडा आजाराचं प्रमाण आढळून आल्यानंतर त्या भागातील पाण्यातील टीडीएसची पातळी प्रचंड वाढली असल्याचं अहवालातून समोर आल्यानंतर आम्ही आमच्या भागात शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेवर काम केलं. गोदावरीचं प्रदूषण ही अशीच मोठी समस्या झाली आहे.

ज्ञान प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवा…

अपूर्वा जाखडी म्हणाल्या, आपण सुदृढ आरोग्यावर चर्चा खूप करतो. मात्र, प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा आपण माघार घेतो. अवकाशक्षेत्रात काम करणारी मंडळी जेव्हा वातावरणाच्या शुन्य गुरुत्वाकर्षण कक्षेत काम करतात तेव्हा फिटनेसचं खरं महत्त्व समजतं. आपण आपल्या शरीर व्यवस्थेला गृहीत धरतो. संतुलित आहार या विषयीचं बरचसं ज्ञान आपल्याकडके असते. मात्र, प्रत्यक्ष कृतीशिवाय त्या ज्ञानाला काहीही अर्थ नाही. त्यासाठी कृतीवर भर दिला पाहिजे. केवळ आरोग्यदिनी नव्हे, तर प्रत्येकाने रोजच व्यायामाला प्राधान्य द्यायला हवे, तरच खर्‍या अर्थाने आरोग्यसंपन्नता येईल.‘आपलं महानगर’चे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, जगभरात घडणार्‍या घटनांची माहिती देऊन लोकांना जागरूक करणे हे माध्यमांचे काम आहे. त्यासोबत समाजाचे आरोग्य चांगले रहावे ही जबाबदारीही असते. याच जाणीवेतून ‘आपलं महानगर’ विशेष उपक्रम राबवित आहे. आरती शिरवाडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -