घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रधुळे जिल्हाधिकाऱ्यांना जे जमले ते नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना जमेल का?

धुळे जिल्हाधिकाऱ्यांना जे जमले ते नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना जमेल का?

Subscribe

नाशिक : शासकीय कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणा ही नागरिकांच्या सेवेसाठी असते असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करतांना धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी थेट आपला व्हॉटसअप नंबरच नागरिकांना उपलब्ध करून दिला आहे. ज्याव्दारे जिल्हाधिकार्‍यांची प्रत्यक्ष भेट होऊ न शकल्यास नागरिकांनी थेट आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर निवेदन पाठवावे वा तक्रार करावी असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी कले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. धुळे जिल्हाधिकार्‍यांना जे जमले ते नाशिक जिल्हाधिकार्‍यांना जमेल का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होेत आहे.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून हे सरकार सर्वसामान्यांचे आहे असा विश्वास निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राज्य शासनाच्या योजना या प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात. या कार्यालयांमधे मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत प्रचंड अनुत्सुकता दिसून येते. ग्रामीण भागातून खेडोपाड्यातून दररोज शेकडो लोक आपल्या तक्रारी, अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत असतात.

- Advertisement -

खालच्या यंत्रणेकडून न्याय न मिळाल्याने जिल्हाधिकार्‍यांना भेटून आपले म्हणणे, गार्‍हाणे मांडावे हा या मागचा हेतू असतो. मात्र अनेकदा जिल्हाधिकार्‍यांच्या व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष भेट घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन धुळे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी अभिनव संकल्पना मांडत थेट आपला व्हॉटसअप क्रमांकच नागरिकांसाठी खुला करून देतांना याव्दारे आपले म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रशासनाविषयीचा नागरिकांमधील विश्वास वाढला आहे.

लोकाभिमूख प्रशासनासाठी प्रयत्न

धुळे जिल्हाधिकारीपदाचा पदभार घेऊन मला महिना झाला. त्यामुळे जिल्हयातील नागरिकांच्या तक्रारी मला समजणे आवश्यक आहे. अनेक लोक दुरवरून आपल्या तक्रारी घेऊन येतात. या नागरिकांच्या तक्रारी सोडवणे हे आमचे काम आहे त्यामुळे ही संकल्पना राबविण्याचा निर्णय मी घेतला. या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसादही लाभत आहे. प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे यादृष्टीने मी नागरिकांना सोशल मिडीया प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून जिल्हयाचे प्रश्न, नागरिकांच्या अडचणी समजून घेउन नियोजन करणे, नागरिकांचे प्रश्न सोडवणे आम्हाला अधिक सोयीस्कर होईल. आपल्या माध्यमातून मी धुळे जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करतो की, त्यांनी आपले महत्वाचे प्रश्न मांडावेत जेणेकरून प्रशासनाला ते सोडविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे शक्य होईल. : अभिनव गोयल, जिल्हाधिकारी धुळे

- Advertisement -

 

नाशिकचे साहेब नेहमीच मिटींगमध्ये…

धुळे येथून नाशिकला बदली होऊन आलेले नवनियुक्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या भेटीसाठी गेलेल्या नागरिकांना जिल्हाधिकार्‍यांचे स्वीय सहायक बाहेरच रोखून धरत असल्याचे चित्र दिसून येते. ‘साहेबांनी सध्या कोणाचीही भेट घेण्यासाठी नकार दिला आहे’ किंवा ‘साहेब मिटींगमध्ये आहेत’ हे उत्तर तर हमखास येते. यापुर्वीचे जिल्हाधिकारी मात्र नागरिकांची थेट भेट घेत असत. यापूर्वीच्या काही तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी तर आठवडयातून काही दिवस ठराविक दिवशी नागरिकांच्या भेटीसाठी खास वेळही ठरवून दिली होती. सध्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडून मात्र नाशिककरांसाठी तसा प्रतिसाद मिळत नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे शासन आपल्या दारी उपक्रम राबवून देखील प्रशासन नागरिकांचे गार्‍हाणे ऐकूणच घ्यायला तयार नसेल तर प्रशासन लोकाभिमुख तरी कसे होणार हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -