घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'मविप्र'त नाराजांचा कल कुणाकडे ?

‘मविप्र’त नाराजांचा कल कुणाकडे ?

Subscribe

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलसह विरोधी गटाच्या परिवर्तन पॅनलच्या नेत्यांमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत खल सुरु राहिल्यामुळे उमेदवारांची नावे जाहीर होताच पत्ता कट झालेल्या गटाने तीव्र नाराजी व्यक्त करत काढता पाय घेतला. या नाराजांच्या उपद्रव कुठल्या पॅनलला होतो आणि कुणाला फायदा होणार याकडे सभासदांचे लक्ष आहे.

मविप्र निवडणुकीत उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याविषयी सभासदांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना शुक्रवारी (दि.19) दुपारी पावणेचार वाजेपर्यंत खल सुरु राहिला. सकाळी 10 वाजेला नाशिकमध्ये दाखल झालेल्या सभासदांना अखेरपर्यंत कौल मिळत नसल्याने त्यांनी पंडीत कॉलनीतील लायन्स क्लब सभागृहात ठिय्या मांडला. तर विरोधी गटाकडेही उमेदवारांची रस्सीखेच असल्यामुळे त्यांनीही पावणेचार वाजेला उमेदवारांची नावे जाहीर केली. सभासदांच्या संयमाचा अंत बघणार्‍या उमेदवारांची नावे जाहीर होताच नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. दिवसभर पंडीत कॉलनीला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. ‘प्रगती’पॅनलमध्ये मालेगाव, नांदगाव, देवळा व पदाधिकार्‍यांमध्ये सर्वाधिक रस्सीखेच दिसून आली. त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुणाला नाकारावी, याविषयी पॅनलच्या नेत्यांपुढे पेच निर्माण झाला. उमेदवारांची निवड करताना पॅनल प्रमुखांना कठोर निर्णय घ्यावा लागला. परिवर्तन पॅनलतर्फे दिंडोरी, चांदवड, सटाणा व नाशिक शहरात रस्सीखेच रंगली. पदाधिकार्‍यांमध्येही काही नाराजी त्यांना पत्करावी लागली. परंतु, नाराजीचा फारसा विचार न करता उमेदवारांचे नातेवाईक, त्यांना स्वत:ला मिळणारी मते या निषकांच्या आधारे उमेदवारी निश्चित केली. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले सभासद आता कुणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -