घरमहाराष्ट्रनाशिकमनमाड, नांदगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री

मनमाड, नांदगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री

Subscribe

मनमाड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेवून आम्ही त्यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले असून त्यांच्या आशीर्वादानेच राज्यात गेल्या सात महिन्यांपासून जनतेची आणि विकासाची कामे सुरु असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आमदार सुहास कांदे यांनी करंजवन पाणीपुरवठा योजनेला बाळासाहेबांचे नाव दिल्यामुळे मी त्यांचा ऋणी असून आम्ही जेंव्हा एल्गार पुकारला तेव्हा सुहास कांदे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होता. तो माझा विश्वासू सहकारी आहे. त्यामुळे मनमाड शहरासोबत नांदगाव मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊन नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबरोबरच एमआयडीसी आणि ट्रामा केअर सेंटरची सुद्धा घोषणा केली.

शहरातील भगवान ऋषी वाल्मिकी स्टेडीयमवर शहराची कायमस्वरूपी पाणी टंचाई दूर करणारी आणि शहरा सोबत या संपूर्ण विभागाची खुंटलेली विकासाची दारे उघडी करणारी 311 कोटीची स्व. बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांच्यासह हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई, बौद्ध, बोहरा आदी समाज आणि धर्मांचे धर्मगुरू, इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले कि, नागरिकांना जर पिण्यासाठी पाणी वेळेत भेटत नसेल तर राज्यकर्त्यांचा उपयोग काय मला आश्चर्य वाटते कि एवढे वर्ष मनमाडकर पाण्यासाठी का थांबले? माहित नाही मात्र तुम्ही सुहास कांदेंसारखा योग्य माणूस निवडला आहे. त्याने सतत पाठपुरावा केला होता. मी नगरविकास मंत्री असताना नगरविकास खात्याचे वतीने ही पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली शिवाय नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती नसल्याने नगर परिषदेचा हिस्सा देखील राज्य सरकार पूर्ण भरेल असेही त्यांनी सांगून पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू होईल आणि लवकरात लवकर मनमाडकरांना मिळणार आहे. यावेळी त्यांनी नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसाठी 10 कोटी निधी मंजूर केल्याची घोषणा केली.

- Advertisement -

मागील अडीच वर्षाच्या काळात सर्व कामे बंद होती, राज्याचा सर्वांगीण विकास साधायचा आहे, सर्वसामान्यांची जाणीव मला आहे. त्यासाठी मी सर्व ठिकाणी पोहोचतो, मुख्यमंत्री म्हणून उभा आहे, पण कार्यकर्ता म्हणून माझे काम सुरू असून एम.आय.डी.सी. ट्रामा केअर अशा मागण्या तुमच्या आमदाराने माझ्याकडे केल्या आहेत. या सर्व मागण्या हमखास पूर्ण होतील असे सांगून एका महिन्यात एमआयडीसी भूसंपादनाचे काम सुरू होईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बोलताना आमदार सुहास कांदे म्हणाले कि, या योजनेसाठी मी माजी मुख्यमंत्र्याकडे चकरा मारून उंबरठे झिजवले होते. मात्र त्यांनी सतत दुर्लक्ष केले. त्यावेळी मी इतका वैतागलो, आपण जर पाणी प्रश्न सोडवू शकत नाही तर मग आमदारकी काय कामाची म्हणून मी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होतो. मात्र त्यावेळचे नगरविकासमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी समजूत काढून त्यांनी क्षणात योजनेला मान्यता दिली आणि आज त्यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन होत आहे. याचा मला आनंद आहे.

आमदार कांदे पुढे म्हणाले कि, साहेब मला तिकीट दिलं नाही तरी चालेल पण ही योजना पूर्ण करा,माझा बाप राजकारणी नव्हता पण मला ज्या जनतेनं आमदार केलं त्यांना निधी कमी पडू देऊ नका. मला दुसरे काहीच नको. माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी तुमचा ऋणी राहील. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि स्थानिक नेत्यांची भाषणे झाली.स्टेडियमवर अनेक मोठ्या नेत्यांची सभा झाली. मात्र आजपर्यंत स्टेडियम कधीच भरले नव्हते. अचूक नियोजनामुळे सुमारे 40 हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित असतानादेखील कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -