घरदेश-विदेशओमायक्रॉनचा देशात शिरकाव कर्नाटकात आढळले दोन रुग्ण

ओमायक्रॉनचा देशात शिरकाव कर्नाटकात आढळले दोन रुग्ण

Subscribe

देशात ओमायक्रॉनचा अखेर शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसेच युरोपमध्ये या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे.

कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमायक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 64 वर्षांचा आहे. तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षांच्या पुढे आहेत. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

- Advertisement -

गेल्या एक महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्येच 10 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. देशातील इतर रुग्णांच्या संख्येने हा आकडा 55 टक्के इतका आहे. 49 टक्के लोकांना कोरोनाचे डोस दिल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आल्याचे केंद्राचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच जगातील 29 देशात ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात आफ्रिकेतून आलेले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनने हाहाःकार माजवला आहे. तिथे दिवसाला कमीत कमी 4 हजार रुग्ण सापडताहेत. सध्या तिथली रुग्णांची संख्या 10 हजारांच्या वर गेलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या बहुतांश प्रांतात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडताहेत. त्यामुळेच महाराष्ट्रासह देशभरात आफ्रिकेतून आलेल्या आणि येणार्‍यांवर प्रशासनाचा वॉच आहे. फक्त दक्षिण आफ्रिकाच नाही तर इतर आफ्रिकन देशातही ओमायक्रॉनचे रुग्ण वाढताहेत. त्यात मोझंबिक, बोत्सवाना, झिम्बाब्वे अशा देशांचा समावेश आहे.

- Advertisement -

राज्य सरकारची नियमावली जाहीर

ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तीत विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. दक्षिण अफ्रिकेसह बोस्वाना आणि झिम्बाब्वे हे तीन देश अतिसंवेदशनशील देश म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या देशातून महाराष्ट्रात येणा-या प्रवाशांची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्या प्रवाशाची रवानगी थेट कोविड केअर सेंटरमध्ये होणार आहे.

दक्षिण अफ्रिकेसह जगातील बारा देशांमध्ये ओमायक्रॉनचे विषाणू सापडल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नवीन नियमावली जाहीर केली असून दक्षिण अफ्रिका, बोस्वाना आणि झिम्बाब्वे हे तीन देश अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. परदेशातून खास करून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या तीन देशातून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

अतिसंवेदनशील जाहीर केलेल्या देशातून आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या प्रवाशांना प्राधान्याने विमानातून खाली उतरवण्यात यावे. या प्रवाशांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करावेत. या प्रवाशांची विमानतळावरच तातडीने आरटीपीसीआर चाचणी होईल. त्यानंतर सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित प्रवाशांची रवानगी विमानतळावरूनच थेट कोविड उपचारांची सुविधा असलेल्या रुग्णालयात होईल. पुन्हा सात दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी होईल. त्यात चाचणी निगेटिव्ह आली तरीही पुढील सात दिवस होम क्वारंटाईन रहावे लागेल.

या प्रवाशांनी मागील पंधऱा दिवसात कोणत्या देशातून प्रवास केला आहे त्याची माहिती एका फॉर्मवर नोंदवून घेतली जाईल. चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास कारवाई होईल. देशांतर्गत विमान प्रवास करणार्‍या प्रवाशांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. अशा प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. अन्यथा 72 तास आधीचा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -