घरमहाराष्ट्रपोलिसांच्या इच्छुक ठिकाणी बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया

पोलिसांच्या इच्छुक ठिकाणी बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया

Subscribe

क्रिम पोस्टिंगसाठी पोलीस दलात छुप्या मार्गाने होणार्‍या अर्थकारणावर मुंबई पोलीस आयुक्तांनी गदा आणली असून यापुढे बदल्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे अर्थकारण नको म्हणून पोलीस निरीक्षक ते पोलीस शिपायापर्यंत इच्छुक स्थळी बदलीसाठी ‘मुंबई पोलीस इन्फॉर्मेशन सिस्टम’(एमपीआयएस) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. मुंबई पोलीस दलात प्रथमच इच्छुक ठिकाणी बदल्यांसाठी हि ऑनलाईन योजना राबवण्यात येत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते पोलीस शिपाई यांना क्रिम पोस्टिंग हवी असल्यास वरिष्टाची मर्जी सांभाळावी लागते, तसेच या बदल्याची अर्थकारण देखील घडून येत असल्याचे प्रकार होत असतात. अनेक वेळा क्रिम पोष्टींगसाठी अधिकार्‍यांकडूनच बोली सुद्धा लागते. काही पोलीस अधिकार्‍यांना अर्थकारण नको असल्यामुळे त्या अधिकार्‍यावर अन्याय होत असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळाले आहे. या अधिकार्‍याला कुठेतरी साईड पोस्टिंगला टाकले जाते. मात्र यापुढे कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा निर्णय मुंबई पोलीस दलात घेण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अधिकारी ते पोलीस शिपाई यांचा ते कार्यरत असलेल्या ठिकाणचा कार्यकाळ संपला असेल व ज्यांना इच्छुक पोलीस ठाणे तसेच इच्छुक पोलीस विभाग या ठिकाणी बदली पाहिजे असल्यास त्यांनी कुणाकडेही न जाता त्यांनी थेट ‘मुंबई पोलीस इन्फॉर्मेशन सिस्टम’(एमपीआयएस) या संकेतस्थळावर आपला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. या अर्जात चार पसंतीचे इच्छुक ठिकाणे टाकून हे अर्ज ऑनलाइनच जमा करायचा आहे. ज्या अधिकार्‍याची अथवा पोलीस शिपायाचा कार्यकाळ संपलेला नसेल आणि ज्यांना इच्छुक ठिकाणी जायचे असल्यास त्यांच्यासाठी देखील हि योजना लागू आहे, मात्र त्यासाठी त्यांना त्याच्या परिमंडलातील पोलीस उपायुक्तांच्या अर्जावर शेरा घेऊन अर्ज करायचा आहे.

मुंबई पोलीस दलातील सर्व पोलीस ठाणे, तसेच संबंधित विभागांना याबाबतची सूचना देण्यात आलेली असून अर्ज कुठल्या पद्धतीने भरायचा आहे त्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. तसेच हे ऑनलाईन अर्ज खासगी संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोन अथवा सायबर कॅफेमध्ये करता येणार नसून पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष शाखा तसेच संबंधित पोलीस विभागात असलेल्या ‘मुंबई पोलीस इन्फॉर्मेशन सिस्टम’ द्वारे भरता येणार आहे. मुंबई पोलीस दलात सध्या या ऑनलाईन योजनेची जोरदार चर्चा सुरु असल्याचे समजते. अर्ज भरण्याचा कालावधी ३१ मे २०१९ रात्री १२ वाजेपर्यंत सुरु असून एकदा अर्ज जमा केल्यावर त्याच्यात बदल करता येणार नसल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -