घरमहाराष्ट्रदुसर्‍या दिवशी सव्वा तासाचेच कामकाज

दुसर्‍या दिवशी सव्वा तासाचेच कामकाज

Subscribe

विरोधकांच्या गोंधळानंतर विधान परिषद तहकूब

राज्यात चिंतातूर असलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीच्या प्रश्नासाठी मंगळवारी विरोधक भाजपने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला. याप्रश्नी विधान परिषदेत आपली मागणी लावून धरीत सभागृहाचे कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. विरोधकांच्या या गोंधळामुळे परिषदेचे कामकाज प्रथम तीनवेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळे विधान परिषदेच्या दुसर्‍या दिवशी अवघ्या सव्वा तासातच सभागृहाचे कामकाज आटोपते घ्यावे लागले.

नागपूर हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून मंगळवारच्या दुसर्‍या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात येणार होती. तर त्याचबरोबर राज्यातील अनेक महत्वाच्या मुद्यांवरुन औचित्याचे प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते. मात्र, शेतकर्‍यांच्या मदतीच्या प्रश्नासाठी मंगळवारी विरोधकांनी पुन्हा एकदा आक्रमक धारण करीत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली आणि सभागृहाचे कामकाज राखून धरले. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे देखील उपस्थित असल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. यावेळी विरोधकांकडून थेट सामन्यातील बातम्यांची बॅनरबाजीच सभागृहात केल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. या फलकावरून विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे चित्र विधान परिषदेच्या सभागृहात दिसून आले.

- Advertisement -

आमदारांनी थेट सत्ताधार्‍यांचा जवळ जावून घोषणाबाजी केल्याने सभागृहात काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे त्यामुळे सभापतींनी प्रथम पंधरा मिनिटासाठी सभा तहकूब केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी २८९ अन्वये अवकाळी पावसाच्या मुद्यावर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विरोधकांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करताच विरोधी पक्षातील आमदारांनी त्यास विरोध केला. या विरोधानंतर विरोधी पक्षांतील आमदारांनी पुन्हा थेट व्हेलमध्ये प्रवेश करीत सभागृहाचे कामकाज थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दुसर्‍यांदा परिषद तहकूब केली. त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर सभापतींनी औचित्याचे मुद्दा पुढे ढकलत आमदार अनिल परब यांना २६० चा प्रस्ताव मांडण्याची सूचना केली. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी आपला आक्रमक पवित्रा धारण करीत घोषणाबाजी सुरु केली. न्याय द्या, न्याय द्या सभापती न्या द्या, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही.शेतकर्‍यांना २५ हजार हेक्टरी मदत मिळालीच पाहिजे. सरकारचा धिक्कार असो. अशा घोषणांनी यावेळी परिषद दणाणून सोडली. त्यामुळे सभापतींनी पुन्हा एकदा पंधरा मिनिटांसाठी परिषद तहकूब केली.

तब्बल तीनवेळा परिषदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर पुन्हा एकदा उपसभापती निलम गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सुरू करण्यात आले. परंतु शेतकर्‍यांच्या मुद्यावर आपल्याला बोलू दिले नाही. म्हणून विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधण्याच प्रयत्न केला.

- Advertisement -

बॅनर्सवरुन विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक
शेतकर्‍यांच्या मुद्यावर आक्रमक होताना मंगळवारी विरोधकांनी विधान परिषदेच्या व्हेलमध्ये घोषणाबाजी करतानाच सामनातील बातम्यांच्या संदर्भातील फलक व्हेलमध्ये झळकावण्यात आली. या फलकावरुन सत्ताधार्‍यांनी ही त्यास विरोध केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. विरोधकांच्या हातातील हे बॅनर्स काढून घेण्याचा प्रयत्न आमदार प्रकाश गजभिये यांनी केला. त्यामुळे विरोधकांनी चीड वाढली त्यामुळे त्यांनी आणखीन आक्रमक स्वरुपात घोषणाबाजी केली.

फलकबाजी नको, सभापतींची सूचना
गेल्या दोन दिवसांपासून सभागृहात आक्रमक होताना विरोधकांकडून विधान परिषदेच्या व्हेलमध्ये बॅनर्स आणी पोस्टरबाजी केली जात आहे. याबद्दल चिंता व्यक्त करतानाच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहाचे नैतिकता टिकवून ठेवताना कोणत्याही सदस्यांकडून यापुढे व्हेलमध्ये बॅनरबाजी करु नये, अशी सूचना केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -