घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र...अन्यथा रस्त्यावर उतरणार; दुध उत्पादक शेतकरी 'यामुळे' झालेत आक्रमक

…अन्यथा रस्त्यावर उतरणार; दुध उत्पादक शेतकरी ‘यामुळे’ झालेत आक्रमक

Subscribe

नाशिक : गेल्या दोन तीन महिन्यांपासून सहकारी संस्था खाजगी प्रक्रिया उद्योगांनी दुधाच्या दरात घट केली आहे. वाढती महागाई, जनावरांचे खाद्य महागल्याने दुग्ध उत्पादक हैराण झाले आहेत. त्यामुळे दुधाला दर मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नाशिकमधील दुध उत्पादक शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

नाशिक जिल्हयातील पळसे, शेवगेदारणा, बाभळेश्वर, मोहगाव, शिंदे, नानेगाव पंचक्रोशीतील दुध उत्पादक शेतकरयांनी मंगळवारी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांची भेट घेत निवेदन दिले. कोविडचे कारण देत दुध दराबाबत संगनमताने दुधाचे दर पडण्यात आल्याचा आरोप या शेतकर्‍यांनी केला. दुग्ध विकास मंत्र्यांनी ही बाब समजून घेत समिती स्थापन करून वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा गाईच्या दुधाला ४०रूपये प्रति लिटर दर देण्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

- Advertisement -

लंपी आजाराच्या पार्श्वभुमीवर दुधाचे उत्पादन घटले असल्याने दुग्ध पदार्थ आयात करावे लागतील असे केंद्रिय मंत्री सांगत असताना महाराष्ट्रातील दुध कंपन्या दुधाचा महापूर आल्याचा कांगावा करत दुधाचे भाव ३९ रूपये लिटरवरून २९ रूपये लिटरवर आणले आहेत. शेतकरी जोडधंदा म्हणून लाखो रूपये कर्ज घेऊन या क्षेत्रात उतरत असताना दुधाचे दर कमी होऊन आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढीबाबत विचार न केल्यास दुध उत्पादक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शेतकरी दिपक गायधनी, संदिप पागेरे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

मराठा महासंघाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक शहर,जिल्हा पुरुष व महिला संघटनेचे वतीने नवनियुक्त जिल्हाधिकार जलज शर्मा यांची भेट घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. आंतर जिल्हा बदलीने शिक्षकांच्या बिंदू नामावली रोस्टर मध्ये झालेल्या गोंधळा मुळे निर्माण झालेल्या परिस्थिती साठी,शासनाने बिंदू नामावली दुरुस्त करावी, मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एमपीएससीने जाहिरातीत सुधारणा करून एसईबीसी, ईडब्ल्यूएस चा निर्णय घेतल्या नंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ मधील निवड झालेल्या परंतु नियुक्ती न मिळालेल्या ९४ मराठा उमेदवाराच्या नियुक्ती करण्यात यावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, शहराध्यक्ष संजय फडोळ, महीला जिल्हा अध्यक्ष अस्मिता देशमाने, शहर अध्यक्ष शोभा सोनवणे,कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके, उदय देशमुख, स्वाती जाधव, विवेक घडूसे,रमेश खापरे, योगेश पिंगळे संगीता पाटील,अनिता पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -