घरमहाराष्ट्रसांस्कृतिक शहरात मतदान शांततेत; कुठे उत्साह, तर कुठे खोळंबा

सांस्कृतिक शहरात मतदान शांततेत; कुठे उत्साह, तर कुठे खोळंबा

Subscribe

निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात झालेल्या मतदानाला अपेक्षेप्रमाणे सकाळच्या सत्रात चांगला प्रतिसाद मिळाला.

देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात झालेल्या मतदानाला अपेक्षेप्रमाणे सकाळच्या सत्रात चांगला प्रतिसाद मिळाला. सोसायटी परिसरात सकाळीच रांगा लावून नागरिकांनी मतदान केले. त्यात ज्येष्ठ नागरिकांचा अधिक उत्साह दिसून येत होता. सारी चोख व्यवस्था केल्याचा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात असला तरी अनेक मतदारांची नावे याद्यांमध्ये नसल्याच्या तक्रारी समोर आल्या.

झोपडपट्टी भागात मतदानाविषयी उत्साह 

ठाण्यातील घोडबंदर परिसरातील हिरानंदानी इस्टेटमधील शाळेत मतदारांनी सकाळी सात पूर्वीच रांगा लावल्याचे दिसून आले. झोपडपट्टी भागातही मतदानाविषयी बऱ्यापैकी उत्साह होता. दुपारी बारानंतर मात्र मतदानाचे प्रमाण काहीसे कमी झाली होती. मतदानासाठी अध्र्या दिवसाची सुट्टी मिळालेल्या बहुतेक कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर मतदानाचे कर्तव्य बजावले. त्यामुळे तीननंतर पुन्हा एकदा मतदान केंद्रांवर वर्दळ दिसू लागली. मुच्छाला महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर नियोजन शून्य कारभार कसा असतो त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. सकाळी साडेआठ वाजताच केंद्राच्या दारापाशी मतदारांची मोठी रांग लागली होती. आत जायला आणि बाहेर यायला केवळ एकच दरवाजा होता. तिथे होणारा खोळंबा पाहून काही ज्येष्ठ नागरिक मतदान न करताच परत गेले. प्रवेश दारापाशी स्पष्ट सूचना देणारे फलक नव्हते, त्यामुळे मतदान केंद्र कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचे वादही झाले.

- Advertisement -

अखेर ‘वाघबीळ’ करांनी केले मतदान

प्रचाराच्या काळात वाघबीळ गाव बरेच गाजले. गावकऱ्यांनी शिवसेनेची प्रचार फेरी अडवली होती. ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या सत्रात गावातून एकही जण मतदानासाठी फिरकला नव्हता. दुसऱ्या सत्रात मात्र ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेत मतदान प्रक्रियेत भाग घेतला. मात्र गावातील २२४ क्रमांकाच्या मतदान केंद्रात धिम्या गतीने मतदान प्रक्रिया सुरू होती. ग्रामस्थांनी याबाबतीत तक्रारी केल्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. भर उन्हात तासभर ताटकळत उभे राहिल्यानंतरच त्यांना मतदान करता येत होते.

मतदारांचा खोळांबा

लुईसवाडी येथील एलआयसी कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रात मतदारांचा बराच खोळंबा झाला. जाण्या-येण्यासाठी एकच दरवाजा असल्याने मतदानाला वेळ लागत होता. त्यात भर म्हणून बुथ क्र. २११ मधील यंत्र वारंवार बंद पडत होते. त्यामुळे नागरिकांना उन्हात उभे रहावे लागले. काहींना या ठिकाणी मतदान करण्यासाठी तीन तास लागले. अखेर या ठिकाणचे यंत्र बदलण्यात आले. परंतु निवडणुक विभागाच्या या गलथान कारभाराचा अनेक नागरीकांनी संताप व्यक्त केला. आझादनगर इथेही मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांचा बराच खोळंबा झाला. अखेर येथील यंत्रही बदलण्यात आले.

- Advertisement -

मतदार याद्यांमध्ये घोळ

पुरेशी दक्षता घेऊनही या निवडणुकीतही मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे आढळून आले. दादोजी कोंडदेव स्टेडियममधील मतदान केंद्रावरील खारटन रोड परिसरातील अनेक कुटुंबे स्थलांतरीत झाली आहेत. त्यांची नावेच यादीतून गायब झाल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागले. नावे गायब होणे, नावे सदोष असणे, फोटो चुकीचे लागणे. मतदार चिठ्ठ्या मतदारापर्यंत वेळेत पोहोचणे अपेक्षित असताना पत्तेच चुकीचे असल्याने मतदारांच्या चिठ्ठ्याही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या.

स्थलांतरितांचा उत्साह

उथळसर परिसरातील स्थलांतरितांनी मतदानासाठी मोठा उत्साह दाखवला. उथळसर तलाव सुशोभिकरणासाठी तेथील अतिक्रमणे मध्यंतरीच्या काळात हटवून त्या कुटुंबांना अन्यत्र हलविण्यात आले. त्यांनी आपल्या मूळ जागी असलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला.

मत देणऱ्यांना थंड पेय

मतदानाचा टक्का वाढावा म्हणून ठाण्यातील प्रसिद्ध प्रशांत कॉर्नरने अनोखा उपक्रम राबविला. मतदान करणाऱ्यांना या दुकानात विनामूल्य कैरी पन्हे दिले जात होते. त्याचप्रमाणे अन्य थंड पेयांचे दरही कमी करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -