घरमहाराष्ट्रफोन टॅपिंग प्रकरण: मुख्य सचिवांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे येणार

फोन टॅपिंग प्रकरण: मुख्य सचिवांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे येणार

Subscribe

पोलिस दलात ट्रान्सफर रॅकेट प्रकरणात झालेल्या फोन टॅपिंगचा अहवाल आज गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बुधवारी रात्री उशिरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दिले होते. त्यामुळेच सीताराम कुंटे यांच्याकडून हा अहवाल आज गुरूवारी दुपारी किंवा सायंकाळी मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल असेही अजितदादा म्हणाले. तत्कालीन गृह विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव सीताराम कुंटे हे सध्या मुख्य सचिव आहेत. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाचा अहवाल हा सीताराम कुंटे यांना देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या अहवालामध्ये नेमकी काय कारवाई करता येईल याबाबतची माहिती असणे अपेक्षित आहे. या संपुर्ण प्रकरणात पोलिस खात्यातील काही लोकांनी अतिशय गंभीर चूक केली आहे. पण ही चूक अतिशय गंभीर असून या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले. या संपुर्ण प्रकरणात सरकार किंवा मुख्यमंत्री कोणालाही पाठीशी घालणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सीताराम कुंटे हे अतिशय सरळमार्गी अधिकारी आहेत. तसेच अतिशय पारदर्शक अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे. बदल्यांच्या संदर्भात अशा पद्धतीची माहिती समोर आल्याने कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळेच पोलिस दलालाच जनतेच्या मनातून उतरवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही अजितदादा यावेळी म्हणाले. पण या संपुर्ण प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणात कुणीतरी दुखावला गेल्या असेल त्यामुळेच अशा पद्धतीची माहिती जाणीवपूर्वक लिक केली गेली. पण या संपुर्ण प्रकरणात जोवर संपुर्ण माहिती मिळत नाही तोवर काही बोलण उचित ठरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -