नितीन गडकरींना महाराष्ट्राची ‘वजनदार’ जबाबदारी

gadkari

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना आपआपल्या राज्याचा ताबा घेण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या राज्याचे लिडर्स व्हा आणि करोनाचा पराभव करण्यासाठी सज्ज व्हा असे आदेश आता पंतप्रधान कार्यालयाकडून आले आहेत. महाराष्ट्रातील दोन दिग्गज केंद्रीय मंत्र्यांना अशीच मोठी जबाबदारी यानिमित्ताने देण्यात आली आहे.

आपआपल्या राज्यातील गरीब आणि गरजु लोकांना पुरेसे अन्न मिळेल याची काळजी घ्या. प्रत्येक ठिकाणी किराणामालाच्या दुकानात पुरेसे धान्य मिळेल तसेच जीवनावश्यक गोष्टींसाठी जास्त पैसे आकारले जाणार नाहीत याची खबरदारी घ्या असेही त्यांनी स्पष्ट केले. आपआपल्या मतदारसंघात स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेत रहा, तसेच वेळोवेळी संवाद साधा असेही आदेश पीएमओंनी दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेऊन परदेशातून येणाऱ्यांचे अपडेट्स ठेवा. करोना पॉझिटीव्ह आणि करोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांचा डेटा वेळोवेळी घेत रहा असेही आदेश त्यांनी दिले आहेत.

अशी आहे राज्यनिहाय यादी

मुक्तार अब्बास नक्वी यांना झारखंडची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राची जबाबदारी नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांना देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशची जबाबदारी राजनाथ सिंह, महेंद्र नाथ पांडे, संजीव बल्यान, कृष्ण पाल गुरजर यांच्याकडे दिली आहे. तर बिहारची जबाबदारी ही रवी शंकर प्रसाद आणि राम विलास पासवान यांच्याकडे आहे. राजस्थान आणि पंजाबची जबाबदारी ही गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे देण्यात आली आहे. लोक प्रतिनिधींनी कम्युनिटी किचनच्या माध्यमातून गरजूंना कोणत्याही गोष्टीचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगितले आहे. करोनाच्या लढाईत लोकांना वेळोवेळी माहिती द्या असेही आदेश यावेळी देण्यात आले.