घरमहाराष्ट्रबिरवाडीची पोलीस चौकी बंद

बिरवाडीची पोलीस चौकी बंद

Subscribe

चोर्‍यांचे प्रमाण वाढले

महाड तालुक्यात बिरवाडी येथे उभारण्यात आलेली पोलीस चौकी गेले अनेक वर्षे बंद असल्याने तेथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. मोहोत व वडघर येथे झालेल्या घरफोड्यांमुळे या पोलीस चौकीची गरज पुन्हा निर्माण झाली आहे.बिरवाडी परिसरामध्ये औद्योगिक क्षेत्र असल्याने या ठिकाणी लहान-मोठ्या गुन्ह्यांच्या घटना अनेकदा घडत असतात. बिरवाडीपासून वरंध, तसेच वाळण असे दोन दुर्गम भागातील विभाग असल्याने या ठिकाणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून या भागातील गावांचे अंतरही दूर आहे. बिरवाडीमध्ये 26 फेब्रुवारी 2012 यावर्षी संदीप सुतार यांच्या घरावर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला होता. भाले आणि तलवारीच्या साह्याने दरोडेखोरांनी घरातील माणसांवर हल्ला केला त्यात शिवानी या त्यांच्या चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर सुतार गंभीर जखमी झाले होते.

दरोड्याची घटना कळताच संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गारील नांगलवाडी फाटा येथे सुमारे एक तास रास्ता रोको केले. या घटनेमुळे बिरवाडी बाजारपेठेत व परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर बिरवाडी व काळीज नाक्यावर पोलीस चौकी बांधण्यात आली. या चौकीमध्ये दोन कर्मचारी तैनात केले जातील असे तत्कालीन अधिकार्‍यांनी सांगितले होते. मार्च 2012 मध्ये या पोलीस चौकीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तिचे उद्घाटनही झाले. काही दिवस या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. परंतु जसे जसे वातावरण निवळू लागले तसे चौकी हळूहळू बंद होत गेली. आता गेल्या अनेक वर्षांपासून या चौकीला कुलूप लावलेले आहे.बिरवाडी हा संवेदनशील भाग मानला जातो. या ठिकाणी औद्योगिक वसाहत देखील आहे. त्यामुळे ही चौकी पूर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे.

- Advertisement -

रात्रपाळीसाठी दोन कर्मचारी कर्मचारी कायम नेमलेले असतात. परंतु ही चौकी केवळ सुरक्षिततेसाठी असल्याने येथे गुन्हा नोंद व अन्य कामकाज होत नसल्यामुळे कर्मचारी तेथे बसून रहात नाहीत, ते गस्तीचे काम करीत असतात.
-आबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे

बिरवाडी संवेदनशील गाव आहे. या ठिकाणी सध्या चोर्‍यांचे प्रमाण देखील वाढले आहे. शिवाय समोरच शाळादेखील आहे. यामुळे चौकी सुरू असणे गरजेचे आहे.
-चंद्रकांत पेंडसे, स्थानिक नागरिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -