घरमहाराष्ट्ररायगडचा भावी शिलेदार कोण?

रायगडचा भावी शिलेदार कोण?

Subscribe

आज मतयंत्रात बंद होणार भवितव्य

यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान मंगळवारी (23 एप्रिल) होत असून, महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत लढतींपैकी एक असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघातील भावी शिलेदार, अर्थात खासदार कोण, यासाठीचा मतदारांचा कौल मतयंत्रात आज बंद होत आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महायुतीचे अनंत गीते व महाआघाडीचे सुनील द. तटकरे यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट आहे. या दोघांनी महिनाभरात अनेकदा मतदारसंघ पिंजून काढला असून, दोघांच्या प्रचारार्थ दिग्गजांच्याही सभा झाल्या. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यानंतर मतदारांनी कोणाच्या पारड्यात मत टाकण्याचा निर्णय घेतला याची गोळाबेरीज समजण्यास 23 मेपर्यंत थांबावे लागणार असले तरी दोन्ही बाजूकडून विजयाची खात्री दिली जात आहे.

- Advertisement -

या मतदारसंघातील निवडणूक ही जातीच्या समीकरणांवर चालत आली असल्यामुळे जातींचे कार्ड याहीवेळी महत्त्वाचे ठरणार आहे. कुणबी मतदारांचा कौल या निवडणुकीत निर्णायक ठरणार का, यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. दापोली व गुहागरचा समावेश रायगड मतदारसंघात झाल्यानंतर कुणबी मतांची संख्या लक्षणीय वाढली आहे. याशिवाय कोळी, आगरी, मुस्लीम समाजाची मतेही मोठ्या प्रमाणावर आहेत. मतदारसंघात हिंदूंची मते 81 टक्के, तर मुस्लीम 12, दलित 6 व इतर समाजाची 1 टक्का मते आहेत. 16 लाख 39 हजार 162 मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यात महिलांची संख्या अधिक असून ती 8 लाख 34 हजार 783 इतकी आहे.

युती व आघाडीकडून शब्दबंबाळ जाहीरनामे प्रसिद्ध झाले असले तरी या मतदारसंघाला भेडसविणार्‍या समस्या तितक्याच लक्षणीय आहेत. नोटाबंदीनंतर नोकर्‍यांची समस्या उद्भवलेली असताना दोन लाखांहून अधिक बेरोजगार नोकरीसाठी वणवण फिरत आहेत. चुकीची धोरणे आणि स्थानिक समस्या यामुळे कंटाळलेल्या कारखानदारांनी कारखान्यांना टाळे ठोकले आहेत. ही संख्या शेकडोच्या घरात आहे. शेजारी मुंबई, ठाणे, पुणे ही प्रगत महानगरे असतानाही रायगड जिल्ह्याचा पाहिजे तसा विकास झालेला नाही, हा कळीचा मुद्दा आहे. लोकप्रतिनिधी एकमेकांवर चिखलफेक करण्यातच वेळ घालवत असल्याने युवा मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

- Advertisement -

गेल्या निवडणुकीसारखी यावेळी मोदी लाट नसल्याने रायगडमधील निवडणूक चुरशीची होणार आहे. गेल्यावेळी लाटेतही तटकरे यांचा निसटता (2110 मते) पराभव झाला होता. यावेळी आघाडीत शेकापही असून, मनसेची साथ मिळणार असल्याने आघाडीकडून शंभर टक्के विजयाची ग्वाही दिली जात आहे. तर गीते सलग सातव्यांदा लोकसभेत जाणारच असा विश्वास त्यांचे पाठीराखे व्यक्त करीत आहेत. गीते यांनी तटकरे यांच्यावर वारंवार केलेल्या भ्रष्टाचाराची मात्रा मतदारांवर बिलकूल चालली नसल्याचे स्पष्ट आहे. भरमसाठ आश्वासने, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ऐकल्यानंतर मतदार कुणाला आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठविणार, याची वाट पाहण्यासाठी बरोबर 1 महिना थांबावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -