घरमहाराष्ट्रकाँग्रेसशी फाटलं, आता प्रकाश आंबेडकरांचं मिशन ४८!

काँग्रेसशी फाटलं, आता प्रकाश आंबेडकरांचं मिशन ४८!

Subscribe

प्रकाश आंबेडकर यांनी अखेर काँग्रेससोबतच्या आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला असून येत्या १५ तारखेला सर्व ४८ उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ नक्की काँग्रेसप्रणीत आघाडीमध्ये जाणार की एमआयएमसोबत जाणार? याविषयी गेल्या काही दिवसांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. प्रकाश आंबेडकर कधी एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत जाहीर सभेत एकाच मंचावरून भाषण देताना दिसायचे, तर कधी काँग्रेसच्या राज्यातल्या नेतेमंडळींसोबत जागावाटपावर चर्चेच्या बैठकीला जायचे. त्यामुळे नक्की त्यांचा पाय कोणत्या जहाजात आहे, हे कळत नव्हतं. दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीला पोहोचली देखील! त्यामुळे अखेर ‘काँग्रेससोबतच्या आघाडीच्या सर्व आशा संपल्या आहेत’ असं जाहीर करत प्रकाश आंबेडकरांनी ‘राज्यातल्या सर्व जागा बहुजन वंचित आघाडी लढवेल’, असं स्पष्ट केलं आहे.

prakash ambedkar
प्रकाश आंबेडकर

आता प्रकाश आंबेडकरांचं मिशन ४८!

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा मंगळवारी रंगल्या होत्या. भारिपचे स्थानिक नेते लक्ष्मण माने यांनी त्यासंदर्भात घोषणा देखील केली होती. मात्र, ‘सोलापुरातून निवडणूक लढवणार म्हणून अकोला सोडणार असं नाही. दोन ठिकाणांहून निवडणूक लढवता येऊ शकते’, असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या मतदारसंघाबाबतचा संभ्रम कायम ठेवला होता. त्याशिवाय काँग्रेससोबतच्या आघाडीचं काय झालं? याचा सस्पेन्स देखील कायम होता. मात्र, मंगळवारी अकोल्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

आम्ही जाहीर केलेले २२ उमेदवार स्वीकारून काँग्रेसने त्यांचा एबी फॉर्म या उमेदवारांना द्यावा अशी ऑफर आम्ही काँग्रेसला दिली होती. पण त्यांच्याकडून ‘हे उमेदवार आमच्या पठडीतले नाही’, असं उत्तर आलं. पठीतले नाही याचा अर्थ हे उमेदवार त्यांच्या कुटुंबातले नाहीत, असा होतो.

प्रकाश आंबेडकर, प्रणेते, वंचित बहुजन आघाडी

- Advertisement -

१५ तारखेला ४८ उमेदवारांची घोषणा

‘काँग्रेसला आम्ही २२ जागांचा प्रस्ताव दिला होता. पण तो त्यांना मान्य नाही. आणि काँग्रेसने दिलेले प्रस्ताव आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे आता काँग्रेससोबत होणाऱ्या संभाव्य आघाडीची शक्यता मावळली आहे. त्यांच्यासोबतची चर्चा पुढे जाईल असं वाटत नाही. म्हणून येत्या १५ तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व ४८ उमेदवारांची नावं जाहीर करणार’, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यामुळे उरलेल्या २६ मतदारसंघांमधल्या उमेदवारांची नावं १५ तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएम या प्रमुख मित्र पक्षासोबत इतर घटक पक्षांसोबत झालेल्या जागावाटपाच्या वाटाघाटींनुसार ही यादी जाहीर करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -