शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओमागे राज सुर्वेंचा हात

युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांचा दावा, व्हिडीओ मॉर्फ असेल तर खरा व्हिडीओ कुठे?

varun sardesai

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनीच तो संपूर्ण व्हिडीओ फेसबुक लाईव्ह केला होता. त्यामुळे खरा आरोपी राज सुर्वेच असून याप्रकरणी राज सुर्वेंना अटक व्हायला हवी, अशी मागणी युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केली आहे. तसेच शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडीओ कुठे आहे, असा प्रश्नदेखील सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले की, एखाद्या आक्षेपार्ह व्हिडीओची तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित व्हिडीओ मॉर्फ झाला की नाही हे तपासणे पोलिसांचे पहिले कर्तव्य असते. जर तो व्हिडीओ मॉर्फ झाला असेल तर खरा व्हिडीओ कुठे आहे याचा तपास केला जातो. त्यामुळे या प्रकरणातील खरा व्हिडीओ समोर आला पाहिजे.

खरंतर हा व्हिडीओ प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून जसाच्या तसा लाईव्ह केला होता. त्यामुळे शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकणात जर कुणाला अटक करायची असेल तर प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वे यांना अटक करा, अशी मागणी वरुण सरदेसाईंनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात राज सुर्वेच मुख्य आरोपी असल्याचा दावाच वरुण सरदेसाई यांनी केला आहे.

अज्ञात व्यक्तीकडून पाठलाग – म्हात्रे
एका अज्ञात व्यक्तीकडून पाठलाग करण्यात येत असल्याचा दावा करीत शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मंगळवारी दादर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यावेळी शिवसेनेच्या दादर येथील महिला पदाधिकार्‍यांसह आमदार सदा सरवणकर हेदेखील शीतल म्हात्रे यांच्यासोबत होते.