घरमहाराष्ट्र'राज ठाकरे म्हणाले कांदे फेकून मारा'

‘राज ठाकरे म्हणाले कांदे फेकून मारा’

Subscribe

नाशिक दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तिथल्या स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भेट घेतली. यावेळी मंत्र्यांना कांदा फेकून मारा असा सल्ला राज ठाकरेंनी दिल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

सध्या राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यातच कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. कांद्याचे भाव उत्पादन खर्चाच्याही निम्म्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या कांदा उत्पादत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून कळवणमध्ये त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी ‘कांदा फेकून मारा’, असा सल्ला राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला.


हेही वाचा – राज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका – मुख्यमंत्री

…तर तोच कांदा नाकाला लावा!

कळवणमध्ये शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी राज ठाकरेंना बुधवारी भेटले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचं गाऱ्हाणं राज ठाकरेंसमोर मांडलं. कांद्याचा दिवसेंदिवस कमी होत जाणारा भाव आणि वाढत जाणारा उत्पादन खर्च या कचाट्यामध्ये शेतकरी सापडल्याचं त्यांनी राज ठाकरेंना सांगितलं. यावेळी सरकारसमोर तुमचं गाऱ्हाणं मांडा असा सल्ला राज ठाकरेंनी दिला. मात्र, मंत्री ऐकत नाहीत असं शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर ‘मंत्री ऐकत नसतील तर त्यांना कांदे फेकून मारा. आणि त्यामुळे मंत्री बेशुद्ध झाले, तर तोच कांदा त्यांच्या नाकाला लावा’, असा सल्ला राज ठाकरेंनी दिल्याचं शेतकरी उत्पादकांच्या प्रतिनिधींनी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच, यावेळी राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना मुंबईत येऊन भेटण्याचं निमंत्रण देखील दिल्याचं शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी नमूद केलं.

- Advertisement -

कांद्याला भाव मिळेना!

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नाशिकमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. कांद्याचा साधारण उत्पादनखर्च क्विंटलला १००० रुपये येत असताना मिळणारा भाव मात्र ५०० ते ७०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी पंचाईत निर्माण झाली आहे. नाशिकच्या निफाडमधल्या संजय साठे नावाच्या एका शेतकऱ्याने आपला संताप व्यक्त करण्यासाठी कांदा विक्रीतून मिळालेले १ हजार ६४ रुपये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनीऑर्डर करून पाठवले होते. तेव्हापासून कांदा उत्पादकांच्या स्थितीकडे लक्ष वेधलं जात आहे.


हेही वाचा – मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ओढली राज ठाकरेंची ‘री’!!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -