घरनवी मुंबईRaj Thackeray : राज ठाकरेंचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर निशाणा, पंतप्रधान मोदींच्या गुजरात...

Raj Thackeray : राज ठाकरेंचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर निशाणा, पंतप्रधान मोदींच्या गुजरात प्रेमाबाबत म्हणाले…

Subscribe

नवी मुंबई : सर्व भाषा शिका, पण जिथे राहाताय तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली आणि यात कमीपणा कसला आला? असा प्रश्न उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. वाशी येथील सीडको प्रदर्शन केंद्रात तीन दिवसीय विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर निशाणा साधला. तर महाराष्ट्रात सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी मराठी सक्तीची करण्यात यावी, अशी मागणीही राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात प्रेमावरही भाष्य केले. (Raj Thackeray Targets English Medium Schools, Says About PM Narendra Modi Gujarat Love)

हेही वाचा… Raj Thackeray : “हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हेच…”, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

- Advertisement -

या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या मराठी शाळा सोडून, ते काय नवे लचांड आले आहे, सीबीएसई काय काय गोष्टी नवीन आल्या आहेत. त्या शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा अनिर्वाय करा. मला समजत नाही, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, जिथे तुमची मुले झाली, त्या मुलांना तुमच्या शाळेत काय शिकवले जाते तर, जर्मन, फ्रेंच. सर्व भाषा शिका, पण जिथे राहत आहात. तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली आणि यात कमीपणा कसला आला. मराठीबाबत बोलल्यानंतर तुम्ही म्हणणार संकुचित आहे, पण कशासाठी संकुचितपणा? असा प्रश्नही यावेळी त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण देत म्हटले की, या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या देशाबाबत वाटते, त्यांच्या राज्याबाबत वाटते. जगातील सर्वात मोठा पुतळा पंतप्रधानांना गुजरातमध्ये बांधावासा वाटतो. आता गिफ्ट सिटी पंतप्रधानांना गुजरातमध्ये बांधावी असे वाटते, हिऱ्यांचा व्यापारही पंतप्रधानांना गुजरातमध्ये न्यावासा वाटत आहे, त्यांनी तो न्यावा. पण मला असे म्हणायचे आहे की, देशाच्या पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबाबतचे प्रेम लपवता येत नसेल, तर तुम्ही आम्ही का लपवत आहात? असा थेट सवाल त्यांनी उपस्थितांसमोर उपस्थित केला.

- Advertisement -

आता अनेकांना वाटेल राज ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली. पण टीका नाही ही, जो मूळ माणूस आहे, त्याला प्रत्येकाला आपल्या राज्याबाबत, भाषेबाबत आणि माणसांबाबत प्रेम आहे. मग तुम्ही का लपवताय? ज्या राज्यात मी राहतो, त्या राज्यातला मराठी माणूस घर घ्यायला जातो आणि तिथल्या एका जैन सोसायटीमधला माणूस सांगतो, आम्ही तुम्हाला घर देणार नाही, तेव्हा काय करायचे आम्ही? असा आणखी एक प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे म्हणाले की, देशातल्या इतर राज्यांमध्ये करून दाखवा की, तिकडच्या स्थानिक माणसाला घर दिले जात नाही पैसे असूनही… असे महाराष्ट्रातच का होते? कारण आमचे बोटचेपे धोरण. आम्हीच पहिले मागे हटतो. कोण म्हणते मराठी माणसाकडे पैसे नाहीत? जे स्वतःच्या गल्लीच्या बाहेर पडत नाही, ते सांगतात मराठी माणसाकडे पैसे नाहीत, एकदा महाराष्ट्र फिरुन बघा, मराठी माणसे कुठे पोहोचलीत हे तुम्हाला कळेल, असेही राज ठाकरेंकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -