घरमहाराष्ट्रकेंद्रीय तपास यंत्रणेशिवाय रेकॉर्डिंग अशक्य; राज्य सरकार आरोपांची चौकशी करेल- शरद पवार

केंद्रीय तपास यंत्रणेशिवाय रेकॉर्डिंग अशक्य; राज्य सरकार आरोपांची चौकशी करेल- शरद पवार

Subscribe

या आरोपांच्या पुष्ट्यार्थ फडणवीस यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशनची माहिती सभागृहात उघड केली. फडणवीस यांनी आपल्या आरोपांचे पुरावे पेनड्राईव्हच्या माध्यमातून विधानसभा उपाध्यक्ष यांना दिले. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.

मुंबई : एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांची 125 तासांची रेकॉर्डिंग होते ही कौतुकास्पद बाब आहे. केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय हे अशक्य आहे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवरून भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्राची सत्ता हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. त्यामुळे अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतली असावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

फडणवीस यांनी केलेल्या आरोपांची चौकशी राज्य सरकार करेल. परंतु 125 तासांच्या रेकॉर्डिंगची सत्यता आधी तपासली गेली पाहिजे, असे स्पष्ट करताना पवार यांनी एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने छापे टाकायचे, याचा अर्थ केंद्राच्या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे दिसते. हा संपूर्ण प्रकार संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अशोभनीय आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सत्ताधारी आघाडीवर भाजपला संपविण्यासाठी षड्यंत्र रचले जात असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या आरोपांच्या पुष्ट्यार्थ फडणवीस यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशनची माहिती सभागृहात उघड केली. फडणवीस यांनी आपल्या आरोपांचे पुरावे पेनड्राईव्हच्या माध्यमातून विधानसभा उपाध्यक्ष यांना दिले. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.

- Advertisement -

फडणवीस यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. मला कौतुक वाटते एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधित 125 तासांची रेकॉर्डिंग करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले. 125 तास रेकॉर्डिंग करायचे याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशेब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंग काम करण्याचे काम खरेच असेल तर शक्तिशाली यंत्रणेचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा यंत्रणा फक्त भारत सरकारकडे आहेत, असे सांगत पवार यांनी रेकॉर्डिंगमागे केंद्र सरकारचा हात असल्याचा आरोप केला.

या संभाषणात माझेही नाव घेतलेले दिसते. यासंदर्भात माझे कुणाशी बोलणे व्हायचे कारण नाही. याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या सहकाऱ्याबाबत तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितले की, त्यात सत्यता किती तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात कार्य करते, तेव्हा त्यावर शहानिशा न करता बोलणे योग्य नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर त्यांच्याकडून मला एवढेच कळले की, तुम्ही सांगितलेल्या लोकांच्या तक्रारीत मी लक्ष घातले. अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत याची काळजी घेईन, असे फडणवीस म्हणाले होते याची आठवण पवार यांनी करून दिली.

- Advertisement -

एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असते त्यावेळी त्याच्या विरोधातील  तक्रारीची शहानिशा केल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही. विनाकारण तक्रार करून लोकप्रतिनिधींवर वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन त्यांना नाउमेद करण्याच्या प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे . विशेषत: महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये त्याची संख्या अधिक आहे, असे निरीक्षणही पवार यांनी नोंदवले. शरद पवार यांनी यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले. मलिकांचा राजीनामा घेण्याचा संबंधच नाही. मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असून मुस्लिम कार्यकर्त्याचे  नाव दाऊदशी जोडायचे हे घृणास्पद आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापराचा विषय पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान  याची खोलात जाऊन चौकशी करतील, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली. सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचे सगळ्यात मोठे उदाहरण हे अनिल देशमुख यांचे आहे. एकाच व्यक्तीच्या घरावर तब्बल 90 छापे टाकण्याचा प्रकार मी तरी पहिल्यांदाच पाहिला आहे, असंही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणालेत.


हेही वाचाः Money laundering case | अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर ‘या’ दिवशी PMLA कोर्टात होणार सुनावणी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -