घरमहाराष्ट्रकोरोना लसीकरणाचे वय १५ वर्षांपर्यंत आणा

कोरोना लसीकरणाचे वय १५ वर्षांपर्यंत आणा

Subscribe

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र, कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी

कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा वाढलेला धोका टाळण्यासाठी लसीकरण हा पर्याय असून यासाठी कोरोना लसीकरणाचे वय १५ वर्षांपर्यंत खाली आणावे, अशी मागणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहून केली आहे. आरोग्य कर्मचार्‍यांना लसीचा बुस्टर डोस देण्यात यावा. त्याचप्रमाणे १०० टक्के नागरिकांच्या लसीकरणासाठी कोविशिल्डच्या दोन लसींमधील अंतर चार आठवड्यांवर आणावे, या मागण्याही आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांनी पत्रात अधिकाधिक लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विविध पर्याय सुचवले आहेत. फ्रंटलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरणाच्या सुरुवातीलाच लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यात यावा. यामुळे त्यांचे कोरोनाच्या नवी व्हेरिएंटपासून अधिक संरक्षण होईल, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

सध्या १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात हे वय १५ वर्षांपर्यंत खाली आणावे अशी मागणी केली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांसोबत केलेल्या चर्चेतून कोरोना लसीकरणाचे कमीत कमी वय १५ वर्षे करणे योग्य असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. असे झाल्यास उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे लसीकरण होऊन त्यांना कोरोनापासून संरक्षण मिळेल, असे आदित्य यांनी नमूद केले आहे.

मुंबईत १०० टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. त्याचप्रमाणे ७३ टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर चार आठवड्यांवर आणल्यास जानेवारीच्या मध्यापर्यंत १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होईल, याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -