घरमहाराष्ट्रस्वतंत्र विदर्भासाठी देखील त्यांनी घोषणा केली होती; फडणवीसांच्या त्या घोषणेवरुन थोरातांचा टोला

स्वतंत्र विदर्भासाठी देखील त्यांनी घोषणा केली होती; फडणवीसांच्या त्या घोषणेवरुन थोरातांचा टोला

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची घोषणा तुम्ही सर्वांनी गंभीरपणे घेतली असं वाटतं, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

माझ्या हातात सत्ता द्या तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन आणि नाही दिलं तर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी लगावली. स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते, अशी आठवण करुन देत भाजप आणि फडणवीस केवळ आश्वासनं देतात अशी टीका थोरात यांनी केली.

“देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गंभीरपणे घेतलं असं मला वाटतं. देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले होते एकदा की, स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी असंही धनगर समाजाला सांगितलं होतं की मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू. माझ्या मते तसंच प्रकारचं हे आहे. जसं त्यांचं लग्न झालं, व्यवस्थित झालं, आम्हाला आनंद आहे त्यामध्ये…धनगर आरक्षणाचा प्रश्न पहिल्या बैठकीत नाही, पाच वर्ष सोडवला नाही. दिशाभूलच करत राहीले. सत्तेसाठी बोलायचं, वारेमाप बोलायचं, वाटेल ते आश्वासन द्यायचं नंतर ते मात्र कृतीमध्ये आणायचं नाही, हा अनुभव भाजपचा आपल्याला आहे. मग तो केंद्रातील मोदी सरकारचा असेल किंवा इथल्या भाजपचा असेल. जनमाणसाला फसवणं आणि त्यातून सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून अशी वक्तव्य ते करतात,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -

वडेट्टीवारांना पुढील काळात मोठी संधी मिळेल

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी ओबीसीच्या परिषदेत मंत्रीपदाबाबत खदखद व्यक्त केली. मला वाटलं महसूल खातं दिलं जाईल, पण दिलं ओबीसी खातं, अशी खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. यावर थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. वडेट्टीवार यांना पुढील काळात मोठी संधी मिळेल, त्यांनी थोडी वाट पाहावी, असा सबुरीचा सल्ला थोरात यांनी दिला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -