घरमहाराष्ट्रRohit Pawar : 'महाराष्ट्र-धर्म' संपवण्याचे काम आधुनिक 'अनाजी पंत' करत आहेत..., रोहित...

Rohit Pawar : ‘महाराष्ट्र-धर्म’ संपवण्याचे काम आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत…, रोहित पवारांचा रोख कोणाकडे?

Subscribe

मुंबई : गेल्या चार वर्षांपासून राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. विशेषत:, गेल्यावर्षभरात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. यासंदर्भातील सुनावण्या सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभेच्या अध्यक्षांसमोर सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी, ‘महाराष्ट्र-धर्म’ संपवण्याचे काम आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत, असे सूचक वक्तव्य केले आहे.

हेही वाचा – Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधानांना दिली ‘ही’ उपाधी

- Advertisement -

राज्यात 2019मध्ये झालेली विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपाने एकत्रितपणे लढविली. पण शिवसेनेने भाजपाने फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी तयार करून सत्ता स्थापन केली. त्यानंतर अडीच वर्षांतच शिवसेनेत मोठी फूट पडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 50 आमदारांनी बंड करत भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. त्याला वर्ष होत नाही तोच, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले आणि एक मोठा गट सरकारमध्ये सामील झाला. या दोन्ही फुटींमागे भाजपा, विशेषत: देवेंद्र फडणवीस असल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

त्यातच शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीर गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. तर, राष्ट्रवादीबाबतची सुनावणी सुरू आहे. याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे.

हेही वाचा – Karnataka High Court : जोडीदाराच्या आधारकार्डशी संबंधित माहिती घेता येते का?

आता पुढील वर्षी आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यादृष्टीने प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवासंघर्ष यात्रा काढली आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केले आहे. युवा संघर्ष यात्रेनिमित्त साडेचारशे किलोमीटरचा प्रवास केल्यावर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका ‘अनाजी पंत’ने संपवली, आताच्या काळामध्ये ‘महाराष्ट्र-धर्म’ संपवण्याचे काम एक आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याची चर्चा सध्या सुरू आहे.

हेही वाचा – Manoj Jarange : आंबेडकरांच्या सल्ल्यानंतर मनोज जरांगे यांनी ‘लायकी’ शब्द घेतला मागे; भुजबळांवर टीकास्त्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -