घरCORONA UPDATELockDown : राज्याची वीज खरेदीत ६० कोटी रूपयांची बचत 

LockDown : राज्याची वीज खरेदीत ६० कोटी रूपयांची बचत 

Subscribe

मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत ६० कोटी रूपयांची बचत महावितरणने या कालावधीत केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्या वीजबिल वसुलीवर परिणाम झाला आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये महावितरणने वीज खरेदीत मोठी बचत केली आहे. मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत ६० कोटी रूपयांची बचत महावितरणने या कालावधीत केली आहे. पॉवर एक्सचेंजमध्ये मुबलक आणि स्वस्त वीज उपलब्ध असल्याने या काळात महावितरणने वीज ग्राहकांचा मोठा फायदा केला आहे.

महावितरणचा वीज खरेदी करार असलेल्या वीज निर्मिती कंपन्यांपेक्षा पॉवर एक्सचेंजमध्ये लॉकडाऊनच्या काळात वीज स्वस्त उपलब्ध होती. देशात औद्योगिक आणि विजेची मागणी कमी होण्याचा परिणाम हा वीज स्वस्त होण्यासाठी झाला. याच संधीचा फायदा घेत महावितरणने या कालावधीत जवळपास १३०० दशलक्ष युनिट इतकी विजेची खरेदी केली. या विजेच्या खरेदीतून महावितरणला ६० कोटी रूपयांचा फायदा झाला. मार्च महिन्यात खरेदी केलेल्या विजेचा दर हा सरासरी २.८८ रूपये प्रति युनिट इतका होता. तर एप्रिल महिन्यात महावितरणने २.८३ रूपये प्रति युनिट इतक्या दराने पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदी केली. त्यामुळे महावितरणसोबत करार असलेले विजेचे संच हे महावितरणने बॅक डाऊन किंवा झिरो शेड्युल्ड करण्यासाठी सांगण्यात आले. परिणामी महानिर्मिती वीज कंपनीच्या संचासोबतच राज्यात अनेक खाजगी वीज पुरवठादारांचे वीज निर्मिती संचदेखील बंद होते.

- Advertisement -

महावितरणने मेरिट ऑर्डर डिस्पॅच (एमओडी) च्या निकषाअंतर्गत पॉवर एक्सचेंजमधील स्वस्त वीज खरेदी केली. त्यामुळे या लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणला ६० कोटी रूपयांची बचत करणे शक्य झाले. ही वीज खरेदीतील बचत ही राज्यातील वीज ग्राहकांचा दर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. महावितरणने पॉवर एक्सचेंजमधून सरासरी २ हजार दशलक्ष युनिट ते ३१०० युनिट इतकी वीज खरेदी दररोज केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -