घरमहाराष्ट्रऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ, राजीनामा मंजूर करण्यासाठी पळापळ

ऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ, राजीनामा मंजूर करण्यासाठी पळापळ

Subscribe

परबांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांची टीम महापालिका आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभागाच्या येरझऱ्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा महापालिका आयुक्तांनी राजीनामा मंजूर केला नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे

मुंबईः शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभेत पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून स्वर्गीय आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आलीय. पण या उमेदवारीनंतरही उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अडचणी काही थांबण्याच्या नाव घेत नाहीयेत.

ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी असल्यानं त्यांच्या उमेदवारीपुढे प्रशासकीय अडचण येण्याची शक्यता आहे. महापालिका सेवा नियमावलीनुसार राजीनामा दिल्यानंतर किंवा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या आता तो मंजूर व्हावा लागतो. विशेष म्हणजे ऋतुजा लटके यांनी रमेश लटकेंच्या निधनानंतर प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिलाय, परंतु अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परबांची चांगली धावाधाव सुरू आहे. परबांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांची टीम महापालिका आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभागाच्या येरझऱ्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा महापालिका आयुक्तांनी राजीनामा मंजूर केला नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ऋतुजा लटके या महापालिका परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात सेवेला आहेत. विशेष म्हणजे हा विभाग महापालिका आयुक्तांच्या अंतर्गत येतो. ऋतुजा लटके यांनी महिन्याभरापूर्वीच राजीनाम्याचा अर्ज सादर केला होता. तसेच तो तातडीने मंजूर करण्याची विनंतीही केली होती. तरीही तो मंजूर झालेला नाही. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे नेते अनिल परब यांनी शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली असून, त्यांच्याकडे ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने मंजूर करण्याची विनंती केली आहे. तसेच यावेळी अनिल परब यांच्यासोबत मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी नगरसेवक मनोहर पांचाळ, सुभाष कांता सावंत, प्रमोद सावंतसुद्धा त्या शिष्टमंडळात होते.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे सहआयुक्त मिलिंद सावंत यांचीही भेट घेऊन त्यांना तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. प्रशासकीय सेवेत 20 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याला राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत यावर कार्यवाही करण्याची अपेक्षा असते, परंतु लटके यांनी राजीनामा देऊन अद्यापही तीन महिन्यांचा कालावधी लोटलेला नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा सेवा कालावधी तपासूनच त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करू, असंही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचाः उद्धव ठाकरेंना कसली सहानुभूती?, राज ठाकरेंचा सवाल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -