घरमहाराष्ट्रचंद्रात होणार साईंच दर्शन; मुंबईत अफवांना उधाण

चंद्रात होणार साईंच दर्शन; मुंबईत अफवांना उधाण

Subscribe

तुम्ही साईंचे खरे भक्त असाल तरच तुम्हाला साईंचे दर्शन होईल असा मॅसेज सोमवारी सोशल मिडियावर वाऱ्यासारखा पसरला. या अफवांमुळे सोमवारी मुंबईत ठिकठिकाणी गर्दी देखील पाहायला मिळाली.

अनेक भक्तांचे साईबाबा हे श्रद्धास्थान आहे. याच श्रद्धेपोटी अनेक भक्त करोडो रुपयांचे दान देखील करतात. बऱ्याच दिवसांपासून साईबाबांचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तर काही दिवसांपूर्वी द्वारकामाईच्या भिंतीवर साईबाबांचे दर्शन झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहिले. तर आता चक्क चंद्रात साईंच दर्शन झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही अफवा मुंबईभर पसरली होती. त्यामुळे मुंबईतील ठिकठिकाणी मैदानांवर चंद्रातील साईंचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.

काय होते या मेसेजमध्ये?

चंद्रात साईबाबा दिसणार असा मॅसेज फेसबुक आणि व्हॉटसअॅपवर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये चंद्रावर साईबाबांची प्रतिमा दिसत आहे. सोमवारी भाद्रपद पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चंद्रात साई दिसणार आहेत. विशेष म्हणजे जर तुम्ही साईंचे खरे भक्त असाल तरच तुम्हाला साईंचे दर्शन होईल असे देखील या मॅसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यामुळे रात्री मुंबईच्या काही रस्त्यांवर अनेकांची गर्दी दिसून येत होती. तर काही जण गच्चीवर जाऊन चंद्र पाहत होते. मात्र ही अफवा नुसती मुंबईपूर्तीच मर्यादीत नसून कोकणातील रत्नागिरी, रायगड परिसरात देखील पसरली असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

याआधी ही दिसले साई

याआधी देखील दगडात आणि भिंतीवर साई दिसले अशा अफवा पसरल्या होत्या. जुलै महिन्याअखेर हीच अफवा उत्तर कर्नाटकात पसरली होती. त्यावेळी चिकमंगलूर जिल्ह्यातील अनेक गावकऱ्यांनी साईंच दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -