घरमहाराष्ट्रपत्राचाळ प्रकरण : संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

पत्राचाळ प्रकरण : संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

Subscribe

पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या कोठडीतील शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुढील सुनावणी साठी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. यामुळे संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम 4 दिवसांनी वाढला आहे.

- Advertisement -

पत्राचाळीतील घोटाळ्याच्या आरोपा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने 31 जुलैला अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. आज त्यांना पुन्हा चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊतांच्या चौकशीसाठी अधिक वेळ मागत ईडीने कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली.

संजय राऊत यांची कोर्टात तक्रार –

- Advertisement -

मला ज्या ठिकाणी ठेवले त्या ठिकाणी व्हेंटिलेशन नाही. तिथे मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे. मला हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतो. रात्री जिथे मला झोपायला देतात तिथेही तीच परिस्थिती आहे. हवा येण्याजोगी एकही खिडकी नाही, अशी तक्रार संजय राऊत यांनी कोर्टात केली. या तक्रारीनंतर कोर्टाने ईडीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. त्यावर राऊत यांना ठेवण्यात आलेल्या खोलीत एसी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मोकळी हवा असणाऱ्या खोलीत ठेवण्याची तयारीही दर्शवली.

ईडीच्या वकिलांचा युक्तीवाद –

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून कार्यरत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. ही रक्कम आणखीही असू शकते, असा दावा ईडीने कोर्टात केला आहे.

राऊत यांच्या वकिलांचा युक्तीवाद –

दोन नवीन आरोप करण्यात आले आहेत. अनोळखी व्यक्तीकडून राऊत यांना पैसे मिळाले तसेच अलिबाग येथील जमिनीच्या खरेदी प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यात रोख रकमेचा वापर करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. मात्र, हे आरोप नवे नाहीत. याआधीही या आरोपांप्रकरणी चौकशी झालेली आहे. मात्र, ईडीकडून दबाव आणला जात आहे, धमकावले जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांच्या विकलांनी ईडीवर केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -