पूरस्थितीच्या संकट काळात राज्याला किमान मदत आणि पुनर्वसन मंत्री तरी द्या, सतेज पाटलांची मागणी

satej patil

राज्यात शिंदे गट-भाजप युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येच बैठका होतात आणि निर्णय घेतले जातात. त्यावरून विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. राज्यात पाऊस पडत असल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, पूरस्थितीच्या संकट काळात राज्याला किमान मदत आणि पुनर्वसन मंत्री तरी द्या, अशी मागणी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केली आहे.

सध्या राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटकाळात राज्याला किमान मदत आणि पुनर्वसन मंत्री तरी द्या. कुणाला किती मंत्रीपद मिळणार याची माहिती नाही. सरकार संकटकाळात कुठं मदत करतंय असंही दिसत नाही. सगळं सावरल्यानंतर सरकार पंचनामे करायला येणार आहे का, असा सवाल सतेज पाटलांनी विचारला आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची काल ईडी चौकशी करण्यात आली. त्यावरही सतेज पाटलांनी भाष्य केलंय. देशात कधीच असं सूडाचं राजकारण केले नाही. विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेसने भारत जोडो अभियान सुरू केलं आहे. त्यामुळे लगेच कारवाईला सुरूवात झाली. परंतु काँग्रेस अशा दबावाला कधीही बळी पडणार नाही. राष्ट्रपती निवडणुकीत शरद पवारांनी विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला म्हणून राष्ट्रवादीलाही टार्गेट केलं जातंय, असं सतेज पाटील म्हणाले.

सतेज पाटलांनी कोल्हापुरचे खासदार संजय मंडलिक यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. संजय मंडलिक दिल्लीला जाताना मला भेटून गेले होते. शिंदे गटासोबत त्यांनी जाऊ नये, अशी विनंती आम्ही त्यांना केली. मंडलिक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्यासोबत राहतील, अशी आशा आहे. मंडलिक यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय दुख:द आहे, असं पाटील म्हणाले.


हेही वाचा : गद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी, आदित्य ठाकरेंचा घणाघात